लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: राज्यात सुरू असलेल्या मराठा आंदोलनादरम्यान काही ठिकाणी जाळपोळ झाली. त्याची गंभीर दखल राज्य सरकारने घेतली आहे. बीडमध्ये लोकप्रतिनिधींची घरे जाळण्यात आली. विशिष्ट समाजाला टार्गेट करण्याचा प्रयत्न झाला. लोक घरात असताना घरे जाळण्याचा प्रयत्न झाला. त्याचे व्हिडिओ पोलिसांकडे असून आतापर्यंत ५० ते ५५ जणांची ओळख पटविण्यात आली आहे. उर्वरित सगळ्यांची ओळख पटविण्यात येणार आहे. अशा आरोपींवर कलम ३०७ अंतर्गत जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.
ओबीसी नेत्यांना सुरक्षा
काही ओबीसी नेत्यांना धमक्या आल्या आहेत. अशा धमक्या आल्या असतील किंवा कोणा ओबीसी नेत्यांना असुरक्षित जरी वाटत असेल तर त्यांना सुरक्षा पुरविण्यात येणार आहे. सोशल मीडियावरून आलेल्या धमक्यांना देखील गांभीर्याने घेण्यात येणार असल्याचेही फडणवीस यांनी सांगितले.
आंदोलनावरून मंत्रिमंडळात चिंता
आंदोलनातील हिंसक प्रकारांबद्दल राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत चिंता व्यक्त करण्यात आली. हे प्रकार काहीही करून थांबवा, असा आग्रह काही मंत्र्यांनी धरला. आंदोलनाची दिशा भरकटवली जात आहे, नेत्यांच्या जिवाला धोका निर्माण झाला आहे. सरकार म्हणून ठोस भूमिका घेतली पाहिजे असे दोन ज्येष्ठ मंत्री म्हणाल्याचे समजते.
‘ते’ व्हिडीओ तपासणार
अतिरिक्त पोलीस कुमक मागविण्यात आली असून ती आवश्यक त्या ठिकाणी तैनात करण्यात आली आहे. जाळपोळीच्या घटनांमध्ये काही राजकीय पक्षांचे नेते, कार्यकर्ते यांचाही सहभाग असल्याचे लक्षात आले आहे. अशा ठिकाणचे व्हिडिओ तपासण्यात येत असून त्याची माहिती लवकरच देऊ असेही फडणवीस म्हणाले.
कोणाला मारून टाकण्याचा किंवा घरे, संपत्ती जाळण्याचा प्रकार झाल्यास पोलिस बघ्याची भूमिका घेणार नाहीत. शांततापूर्ण आंदोलने जरूर करावीत, मात्र महाराष्ट्रात हिंसेला अजिबात थारा देणार नाही.-देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री