पुणे : ‘विचारवंतापेक्षा आचारवंत केव्हाही मोठा असतो. आचारवंत आपल्या कृतीत विचार उतरवतात. त्यातून समाजाला पुढे नेण्याचे कार्य करतात. शाहीर द. ना. गव्हाणकर, अमर शेख आणि अण्णा भाऊ साठे हेही आचारवंतच होते. त्यांनी त्यांचे विचार आचरणातून मांडले. अशी थोर मंडळी ज्यांनी त्याग करून महाराष्ट्र घडविला, त्यांचा वारसा जपला पाहिजे, पुढे नेला पाहिजे. राजकारणापेक्षा सांस्कृतिकीकरणाकडे आपला ओढा असायला हवा,’’ असे मत संत वाङ्मयाचे अभ्यासक डॉ. अशोक कामत यांनी व्यक्त केले.लोकशाहीर द. ना. गव्हाणकर यांच्या जन्मशताब्दीनिमित्त डॉ. माधव पोतदारलिखित ‘लोकशाहीर द. ना. गव्हाणकर’ पुस्तकाचे अखिल भारतीय मराठी शाहिरी परिषदेचे अध्यक्ष दादा पासलकर यांच्या हस्ते शनिवारी प्रकाशन झाले. गव्हाणकरांचे कुटुंबीय व मानसगंध प्रकाशनाच्या वतीने हा प्रकाशन सोहळा झाला. ज्येष्ठ साहित्यिक ह. मो. मराठे अध्यक्षस्थानी होते. प्रा. श्रीकांत नाईक, गव्हाणकर यांचे पुत्र विनय व जावई अरुण नेवाळकर, लेखक माधव पोतदार, डॉ. मनीषा पोतदार आदी उपस्थित होते. कामत म्हणाले, ‘‘ठराविक लोकांचा उदो उदो करून काहींना प्रकाशात, तर काहींना उपेक्षित ठेवण्याचे राजकारण नेहमीच होते. सत्तेच्या राजकारणासाठी याचा वापर करणाऱ्या बेरक्या मंडळींनी अशांचा ताबा घेतला आहे. केवळ द्वेष, असूया आकस राखून प्रगती होईल का? आजच्या समाजातील खरी लढाई ही सत्तापिपासू, आयतोबा आणि उपेक्षित, बकाल आयुष्य जगलेल्या लोकांमधील आहे. आजच्या काळात अण्णा, अमर व दत्ता गव्हाणकर यांच्या समाजातील लोकांना हे समजायला हवे, की धर्म नव्हे, तर मर्म व कर्म ओळखायला हवे. ’’ (प्रतिनिधी)४उपेक्षितांचे चरित्रसंवाद, अवघड विषयांवरचे विश्लेषण डॉ. माधव पोतदार समर्थपणे करीत आहेत. उपेक्षितांना आपलेसे करून त्यांनी लेखन केले; मात्र त्याची म्हणावी तशी दखल घेण्यात आली नाही. ते कायमच उपेक्षित संशोधक राहिले. अमर शेख, अण्णा भाऊ साठे व आता द. ना. गव्हाणकर या तिन्ही शाहिरांवर संशोधनात्मक लिहिणाऱ्या पोतदारांची दखल घेणे आवश्यक आहे. महाराष्ट्राने त्यांची दखल घेऊन त्यांना पुरस्कृत करायला हवे. दखलीची फिकर न करता झोकून देऊन लेखन करणाऱ्यांना दाद द्यायला हवी, असे ज्येष्ठ साहित्यिक ह. मो. मराठे यांनी सांगितले.
विचारवंतापेक्षा आचारवंत मोठा
By admin | Published: April 26, 2015 1:21 AM