नवी दिल्ली : नक्षल्यांसोबत कथित संबंध असल्याच्या आरोपाखाली दिल्ली विद्यापीठाचे (डीयू) प्राध्यापक जी.एन. साईबाबा यांना झालेल्या अटकेविरुद्ध डीयू आणि जवाहरलाल नेहरू विद्यापीठाचे विद्यार्थी शनिवारी रस्त्यावर उतरले.
एका वरिष्ठ अधिकार्याने सांगितले की, साईबाबा यांची तात्काळ सुटका करा, अशी मागणी करीत सुमारे ५0-६0 विद्यार्थी कस्तुरबा गांधी मार्गावरील महाराष्ट्र सदनासमोर जमले. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या नावाने या विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र सदनाच्या स्थानिक आयुक्तांकडे एक निवेदन सोपवले. प्रा. साईबाबा यांची अटक बेकायदेशीर असून, हा त्यांना गोवण्याचे प्रयत्न असल्याचे या निवेदनात म्हटले आहे.
जहाल नक्षलवाद्यांच्या देशभरातील कामात सक्रिय असलेले आंतरराष्ट्रीय विभागाचे अध्यक्ष, तसेच देशपातळीवर नक्षल चळवळीसाठी समन्वयक म्हणून काम करणार्या प्रा. साईबाबांना शुक्रवारी गडचिरोली पोलिसांनी दिल्लीत अटक केली होती. त्याच्यावर बेकायदेशीर हालचाली प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याच्यावर गेल्यावर्षीच्या ऑक्टोबरपासून पाळत ठेवण्यात आली होती. (वृत्तसंस्था)