ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 6 - संपकरी शेतकऱ्यांनी सरकारविरोधात पुकारलेल्या ‘बंद’ला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. पण, सलग पाच दिवस सुरू असलेल्या शेतक-यांच्या संपाचा आक्रोश सरकारपर्यंत पोहोचला आहे का?, असा प्रश्न शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सामना संपादकीयमधून उपस्थित केला आहे.
तसंच शेतक-यांच्या संपामध्ये शिवसेना पाठिशी आहे, याचा देखील पुर्नउल्लेख त्यांनी संपादकीयमधून केला आहे.
शिवाय, शेवटची मागणी मान्य होईपर्यंत हा लढा सुरू ठेवावाच लागेल, अशा इशाराही उद्धव यांनी दिला आहे.
काय आहे सामना संपादकीय?
राज्यातील शेतकऱ्यांनी सोमवारी पुकारलेल्या ‘महाराष्ट्र बंद’ला अपेक्षेप्रमाणेच प्रचंड आणि उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. ठिकठिकाणी निदर्शने, रास्ता रोको, प्रतीकात्मक अंत्ययात्रा, पुतळ्यांचे दहन, सरकारच्या निषेधार्थ मुंडण, ‘जोडे मारा’ आंदोलन करून शेतकऱ्यांनी आपला संताप व्यक्त केला. शेतकऱ्यांचा संप फोडण्याचा प्रयत्न तीन दिवसांपूर्वी राज्य सरकारकडून झाला. मात्र हा प्रयत्न शेतकऱ्यांच्या एकजुटीने फोल ठरवला आहे. सोमवारी याच वज्रमुठीचे तडाखे महाराष्ट्रात ठिकठिकाणी बसले. बहुतेक सर्वच जिल्ह्यांतील प्रमुख बाजारपेठा, बाजार समित्या पाचव्या दिवशीही ओस पडलेल्या होत्या. नगर, सोलापूर, सांगली, सातारा, कोल्हापूर, नाशिक, नागपूर, धाराशीव, लातूर, पुणे, धुळे, नंदूरबार आदी सर्वच जिल्हय़ांमध्ये ‘बंद’ कडकडीत आणि शंभर टक्के यशस्वी झाला. अनेक ठिकाणी रास्ता रोको, चक्का जाम वगैरे झाल्याने राज्य आणि राष्ट्रीय महामार्गावरील वाहतुकीवर त्याचा परिणाम झाला. नाशिकमधील शेतकऱ्यांनी बैलगाड्या आणून रस्ता रोखला, तर पुणतांब्यातील शेतकऱ्यांनी मालगाडी रोखून निदर्शने केली. शेतकऱ्यांच्या संतापाचा हा उद्रेक सलग पाचव्या दिवशी महाराष्ट्राने पाहिला. अर्थात राज्य सरकारने तो पाहिला का? शेतकऱ्यांच्या निषेधाने सरकारच्या कानाचे पडदे फाटले का? बळीराजाच्या या संतापाची धग राज्यकर्त्यांना जाणवली का?
असे अनेक प्रश्न तूर्त अनुत्तरितच आहेत. सरकारकडून या प्रश्नांची उत्तरे जेवढ्या लवकर कृतीतून दिली जातील तेवढी ती सर्वांच्याच हिताची आहेत. शेतकरी संप आणि सोमवारचा ‘कडकडीत बंद’ ही बळीराजाच्या मनातील खदखद आहे. काही ठिकाणी भलेही जाळपोळ, तोडफोड, बाचाबाची अशा घटना घडल्या असतील, पण त्याकडे सरकार आणि समाजानेही ‘आंदोलनाला हिंसक वळण’ या नेहमीच्या चष्म्यातून पाहू नये. या घटनांना हिंसाचार न मानता त्याकडे बळीराजाच्या संतापाचा उद्रेक म्हणून पाहायला हवे. शेतकऱ्याच्या पोटात खदखदणारा भुकेचा लाव्हाच जणू या आंदोलनाच्या माध्यमातून उफाळून आला आहे. सामान्य शेतकऱ्याची ही भूक समजून घेतली पाहिजे. प. महाराष्ट्रातील शेतकरी मुंडण करतो, मराठवाड्यातील शेतकरी अर्धनग्न अवस्थेत तहसीलदारांना निवेदन देतो. सोलापूर जिल्हय़ात पाण्याच्या टाकीवर चढून शेतकरी ‘शोले’ स्टाइल आंदोलन करतो. हे शेतकऱ्यांचे ‘स्टंट’ नाहीत; ती त्यांची व्यथा आहे. आता तरी ती समजून घेतली जाणार आहे की नाही? मात्र त्याऐवजी नाशिकमधील आंदोलनाचा भडका पाहून तेथील इंटरनेट सेवा बंद करण्याचा निर्णय घेतला जातो. प्रशासनाला नाशिक हे अशांत कश्मीर आणि आंदोलनकर्ते शेतकरी म्हणजे जवानांवर दगडफेक करणारे देशद्रोही नागरिक वाटले का? शेतकरी आंदोलनाचा भडका उडालेला असताना आगीत तेल ओतणारे हे प्रकार कशासाठी? ते थांबवा, नाहीतर शेतकरी
आंदोलनाचा भडकलेला ‘शोले’
कशाकशाची राखरांगोळी करेल हे सांगता येत नाही. शेतकऱ्यांचा संप आणि प्रचंड यशस्वी झालेला ‘महाराष्ट्र बंद’ हा बळीराजाच्या पेटलेला वेदनेचा एल्गार आहे. सरकार, समाज आणि सोशल मीडियावरून या आंदोलनाची ‘थट्टा’ उडविणारे, त्याला ‘आरोपीच्या पिंजऱ्या’त उभे करणारे अशा सर्वांनीच या संतापामागील वेदना समजून घ्यायला हवी. महाराष्ट्राच्या जवळ जवळ सर्वच भागातील शेतकरी या संपात सहभागी झाले आहेत. शिवसेनेनेही या संपाला संपूर्ण पाठिंबा दिलाच आहे. या साऱयांचा एकत्रित परिणाम म्हणूनच शेतकऱ्यांच्या ऐक्याची वज्रमूठ आणि तिचे तडाखे प्रस्थापितांना बसत आहेत. ऐक्याची ही वज्रमूठ शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमुक्ती आणि हमीभाव दिल्याशिवाय राहणार नाही. शेतकऱ्यांच्या पेटलेल्या वेदनांवर आता आश्वासनांची फुंकर उपयोगाची नाही हाच सोमवारच्या ‘कडकडीत बंद’ने राज्यकर्त्यांना दिलेला इशारा आहे. त्यापासून योग्य धडा घेतला नाहीतर आज उफाळून आलेला शेतकरी वेदनेचा लाव्हा उद्या भयंकर उत्पात घडविल्याशिवाय राहणार नाही, हा इशारा आम्ही आजच देऊन ठेवत आहोत. शेतकऱ्यांचा ‘महाराष्ट्र बंद’ प्रचंड यशस्वी झाला. मात्र ही लढाईची सुरुवात आहे. ती पुढेही सुरूच राहील. शेवटची मागणी मान्य होईपर्यंत हा लढा सुरू ठेवावाच लागेल. शिवसेना पूर्वीही शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभी होती, आजही आहे आणि उद्याही राहीलच.