औरंगाबाद/सोलापूर/कोल्हापूर : मराठा आरक्षणाला न्यायालयाने स्थगिती दिल्याने मराठा समाजामधून तीव्र संताप व्यक्त होत असून आज मराठवाडा व सोलापूर जिल्ह्यात लोकप्रतिनिधींच्या घरासमोर समाजाच्या वतीने निदर्शने करण्यात आली.परभणीत सकल मराठा समाजाच्या वतीने आ़ डॉ़ राहुल पाटील, आ़ सुरेश वरपूडकर, आ़ मेघनाताई बोर्डीकर, खा़ बंडू जाधव, खा़ फौजिया खान यांच्या घरासमोर निदर्शने आंदोलन करण्यात आली़ नांदेडमध्ये मराठा आरक्षणासाठी सरकारने अध्यादेश काढावा, अशी मागणी अ़भा़ छावा मराठा युवा संघटनेचे कार्याध्यक्ष नानासाहेब जावळे पाटील यांनी पत्रकार परिषदेत केली़ हिंगोलीत मराठा क्रांती मोर्चातर्फे जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठविण्यात आले. वसमत तालुक्यातील गिरगाव येथेही शासनाच्या नाकर्तेपणाचा निषेध करत आरक्षण मिळविण्यासाठी एल्गार आंदोलन करण्यात आले.तुळजापूर येथे पार पडलेल्या सकल मराठा समाजाच्या बैठकीत प्रत्येक तहसील कार्यालयासमोर १६ सप्टेंबरला ‘बोंबा मारो’ आंदोलन करून लक्ष वेधण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
लोकप्रतिनिधींच्या घरासमोर मराठा समाजातर्फे निदर्शने,
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2020 4:06 AM