मुंबई - छत्रपती शिवाजी महाराजांचे गडकिल्ले हे महाराष्ट्राच्या अस्मितेचे वैभव आहेत. ४०० वर्षानंतरही आजही सोनेरी इतिहासाच्या पाऊलखुणा जपत भक्कम उभे आहेत. दरवर्षी लाखो शिवप्रेमी या किल्ल्यांवर जात असतात. त्यात आता छत्रपती शिवरायांच्या ११ किल्ल्यांना वर्ल्ड हेरिटेज यादीत नामांकन मिळाले आहे. या किल्ल्यांना असलेला शौर्य, पराक्रम, रयतेच्या कल्याणाचा वारसा आणि ऐतिहासिक महत्त्व लक्षात घेता त्यावर अंतिम मोहोरही उमटेल असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला आहे.
एकनाथ शिंदे यांनी ट्विट करून माहिती दिली की, हिंदवी स्वराज्याची स्थापना करणाऱ्या आणि रयतेच्या कल्याणासाठी झटणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी भक्कम गड किल्ल्यांची बांधणी करून सक्षम राज्य निर्माण केले. हे गडकिल्ले स्वराज्याची शान आणि महाराष्ट्राच्या समृद्धीचे द्योतक आहेत. गेली अनेक शतके ताठ मानेने उभे असलेल्या या गड किल्ल्यांवर ऐतिहासिक वारशाची मोहोर उमटवण्याचा प्रयत्न सुरू आहेत. महाराष्ट्रातील ११ आणि तामिळनाडूच्या जिंजी किल्ल्याला युनेस्को वर्ल्ड हेरिटेज लिस्ट २०२४-२५ मध्ये नामांकन मिळाले आहे. साल्हेर, शिवनेरी, लोहगड, खांदेरी, रायगड, राजगड, प्रतापगड, सुवर्णदुर्ग, पन्हाळा, विजयदुर्ग, सिंधुदुर्ग या महाराष्ट्रातील शिववारशाला जागतिक ओळख मिळू शकणार आहे असं त्यांनी सांगितले.
तसेच युनेस्कोच्या प्रतिष्ठित व्यासपीठावर महाराष्ट्राला नामांकन मिळणे ही अत्यंत अभिमानास्पद बाब आहे. महाराष्ट्रातील गड किल्ल्यांना नामांकन मिळाल्याने पहिली पायरी सर झाली आहे. या किल्ल्यांना असलेला शौर्य, पराक्रम आणि रयतेच्या कल्याणाचा वारसा आणि ऐतिहासिक महत्त्व लक्षात घेता, त्यावर अंतिम मोहोरही उमटेल, अशी मला खात्री वाटते असंही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं.
युनेस्को वर्ल्ड हेरिटेज घोषित झाल्यास काय फायदा होतो?
जगभरातील ऐतिहासिक स्थळे आणि सांस्कृतिक वारसा असलेल्या ठिकाणांचे रक्षण व्हावे यासाठी युनेस्को वर्ल्ड हेरिटेज संस्था कार्य करते. युनेस्कोनं एखाद्या ठिकाणाचा त्यांच्या यादीत समावेश केला तर ते ठिकाण संपूर्ण जगाला माहिती होते. त्यामुळे याठिकाणी पर्यटक मोठ्या संख्येने येतात. युनेस्कोच्या यादीत असलेल्या ठिकाणाची देखरेख आणखी जबाबदारीने करावी लागते. जर त्यात कुठल्याही प्रकारे निधीची कमतरता भासत असल्यास युनेस्को त्याची संपूर्ण जबाबदारी घेते.