- नीतीन गव्हाळे
अकोला : खेड्यातून आलेल्या १४ जणी. शेतकरी, शेतमजूर कुटुंबातील. मराठी माध्यमात शिकणाऱ्या; परंतु शिक्षण घेण्याची धडपड. काहीतरी वेगळे करण्याची जिद्द. यातूनच जन्म घेतला, समाजोपयोगी स्वयंचलित रोबोटने! या रोबोटने मुंबई येथील राष्ट्रीय रोबोटिक्स स्पर्धेत चार फेऱ्यांमध्ये देशभरातील २०० चमूंना मागे टाकत तब्बल तीन पुरस्कार पटकावले. मनूताई कन्या शाळेच्या त्या १४ जणी आता अमेरिकेला जाण्यासाठी सज्ज आहेत.
मुंबई लिगो एज्युकेशन ऑर्गनायझेशनच्या फर्स्ट लिगो लीगमध्ये ‘शहरातील समस्या व त्यांचे निराकरण’ या विषयावर मुंबईला नुकतीच स्पर्धा घेण्यात आली. त्यात इयत्ता आठवी व नववीत शिकणाºया १४ विद्यार्थिनींनी सहभाग घेतला. त्यांनी छोट्या पार्ट्सचा वापर करून अत्यंत कल्पकतेने रोबोट बनवला. त्याचे डिझाइन, प्रोग्रॅमिंगदेखील स्वत:च बनवले. या विद्यार्थिनींनी ‘रोप स्विंग अॅक्सिडेंट प्रिव्हेंशन’ हा संशोधन प्रकल्पसुद्धा लीगमध्ये सादर केला.शाळेने काढली मिरवणूक
या सर्व विद्यार्थिनी मराठी माध्यमात शिकत असून, त्यांचे आई-वडील शेतमजुरी करतात. छोट्या गावांमधून येणाऱ्या विद्यार्थिनींकडे ऑटोरिक्षाने शाळेत यायलासुद्धा पैसे नसतात. बऱ्याचदा या विद्यार्थिनी पायीच शाळेत येतात. येथील शिक्षकांनी या विद्यार्थिनींची वाजतगाजत जंगी मिरवणूक काढली. बेस्ट टीमवर्क व देशातून निवडलेल्या ४० चमूंमधून ऑल ओव्हर चॅम्पियन अॅवॉर्डसुद्धा पटकावले. त्यांच्या मार्गदर्शक काजल राजवैद्य यांना बेस्ट मेन्टॉरचा पुरस्कार मिळाला.या आहेत, विजेत्या विद्यार्थिनी
रुचिका मुंडाले (रिधोरा), निकिता वसतकार (रिधोरा), स्नेहल गवई (अकोला), अर्पिता लंगोटे (रिधोरा), सानिका काळे (अकोली खु.), गौरी झामरे (खडकी टाकळी), आंचल दाभाडे (सोमठाणा), पूजा फुरसुले (अकोली बु.), सायली वाकोडे (रिधोरा), अंकिता वजिरे (भोड), समीक्षा गायकवाड (उमरी), प्रांजली सदांशिव (खडकी टाकळी), गायत्री तावरे (भौरद), प्रणाली इंगळे (सोमठाणा)