जळगाव : खान्देश विकास आघाडी व राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यातील करार आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला दिलेला निधी हे दोन्ही आरोप एकनाथराव खडसे यांनी सिद्ध करून दाखविल्यास राजकारणातून कायमस्वरूपी नवृत्त होईल व त्यांची माफी मागेल, मात्र आरोप सिद्ध करू न शकल्यास खडसे यांनी जनता, प्रशासन व न्यायालयाची जाहीर माफी मागावी, असे जोरदार आव्हान खान्देश विकास आघाडीचे अध्यक्ष रमेशदादा जैन यांनी खडसे यांना शनिवारी दिले.
लोकसभा निवडणुकीत खाविआने राष्ट्रवादी काँग्रेसला मदत केल्याची परतफेड म्हणून घरकूल प्रकरणातील आरोपींना जामीन मिळावा यासाठी विशेष सरकारी वकील अँड.निर्मलकुमार सूर्यवंशी व अँड.प्रवीण चव्हाण यांची नियुक्ती रद्द केल्याचा आरोप खडसे यांनी शुक्रवारी पत्रपरिषदेत केला होता. त्याला रमेशदादा जैन यांनी शनिवारी प्रत्युत्तर दिले.
प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, अँड.सूर्यवंशी व सहाय्यक विशेष सरकारी वकील म्हणून प्रवीण चव्हाण यांची नियुक्ती होण्यासाठी खडसे यांनी २२ नोव्हेंबर २0१२ रोजी शासनाला पत्र दिले होते. शासनाने ते मान्य करून त्यांची नियुक्ती केली व तेव्हापासून ते आजपर्यंत विशेष सरकारी वकील म्हणून कामकाज पाहत होते. हे मात्र खडसे सोयीस्करपणे विसरून राजकीय षडयंत्र असल्याचा खोटा आरोप करीत आहे. त्याचा आम्ही तीव्र निषेध करतो.
आमचा न्यायालय, प्रशासन व राज्यकर्त्यांवर पूर्ण विश्वास आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिलेल्या निकालाच्या आधारावर शासनाने विशेष सरकारी वकीलांसंदर्भातील भूमिका घेतल्याचे गृहमंत्री आर.आर.पाटील यांनी स्पष्ट केले आहे. याचा अर्थ खडसे हे दिशाभूल करीत असून, सोयीचे, सुडाचे व व्यक्तीद्वेषाचे आणि समाजामध्ये तिढा निर्माण करणारे राजकारण करीत आहेत, असा आरोप निवेदनात करण्यात आला आहे.