मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात आज भूकंप पहायला मिळालेला आहे. आज अचानक पहाटे राष्ट्रपती राजवट उठवून राज्यपालांनी देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांना उपमुख्यमंत्रीपदाची शपथ दिली. या घडामोडींमुळे राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली असून शरद पवारांनाही धक्का बसला आहे.
यामुळे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि शरद पवार आज दुपारी 12.30 वाजता संयुक्त पत्रकारपरिषद घेणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अजित पवार यांचा हा वैयक्तिक निर्णय आहे. याला पक्षाचा पाठिंबा नसल्याचं पवारांनी म्हटलं आहे. तसेच राष्ट्रवादीच्या आमदारांना सायंकाळी 4.30 वाजता बैठकीसाठी बोलावण्यात आले आहे.
काल रात्री काँग्रेस-राष्ट्रवादी आणि शिवसेनेची बैठक फिस्कटली होती. यानंतर मध्यरात्री साडेबारा वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार दोघे राज्यपालांना भेटले. एक वाजता राज्यपालांनी केंद्राकडे शिफारस केली. राष्ट्रपती राजवट हटवण्याची सकाळी सातची शपथविधीची वेळ ठरली. काँग्रेस शिवसेनेला बाजूला ठेवून भाजप आणि राष्ट्रवादीचे सरकार स्थापन झाले. यात प्रफुल्ल पटेल यांनी मोठी भुमिका बजावली आहे.
या पार्श्वभुमीवर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी 30 नोव्हेंबरपर्यंत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना बहुमत सिद्ध करण्यास सांगितले आहे. अशावेळी भाजपाला बहुमतासाठी 39 मतांची गरज आहे. यामुळे अजित पवार यांच्याबरोबर किती आमदार आहेत आणि भाजपा आणखी किती आमदारांची मते मिळवू शकते यावर सारी गणिते अवलंबून आहेत.