जालना येथील अंतरवाली सराटी गावात मराठा आरक्षणाची मागणी करणाऱ्या आंदोलकांवर लाठीमार झाल्याने जनप्रक्षोभ उसळलेला आहे. दरम्यान हा बेछूट लाठीमार वरून, मंत्रालयातून आलेल्या आदेशानुसार झाल्याची शंका आहे, असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी केला होता. त्याला आता अजित पवार यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. वरून आदेश आले आहेत, असं काहीजण खुशाल सांगताहेत. मी आपल्याला स्पष्टपणे सांगतो की, जर वरून आदेश आले हे सिद्ध करून दाखवलं तर आम्ही तुम्ही म्हणाल ते ऐकू, असं आव्हान अजित पवार यांनी दिलं आहे.
यावेळी अजित पवार म्हणाले की, मी संपूर्ण मराठा समाजाला सांगतो की, काही जणांना विनाकारण बदनाम करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. वरून आदेश आले आहेत, असं काहीजण खुशाल सांगताहेत. मी आपल्याला स्पष्टपणे सांगतो की, जर वरून आदेश आले हे सिद्ध करून दाखवलं तर आम्ही तुम्ही म्हणाल ते ऐकू. पण कारण नसताना उगाचच शंका निर्माण करायची. गैरसमज निर्माण करायचे. समाजामध्ये अस्वस्थता निर्माण करायची. त्यातून आपल्याला काही साध्य करता येतं का, अशा प्रकारचा जो केविलवाणा प्रयत्न चालवलेला आहे. तो आपल्या महाराष्ट्राला परवडणारा नाही, असे अजित पवार म्हणाले.
त्यांनी पुढे सांगितलं की, आपला महाराष्ट्र हा सुसंस्कृत महाराष्ट्र आहे, याची ओळख सर्वांनी डोळ्यांसमोर ठेवली पाहिजे. तसेच यापुढे ही आंदोलनं थांबवली पाहिजेत. शांततेच्या मार्गाने आंदोलन कऱण्याचा अधिकार सर्वांना आहे. तो कुणीही हिरावून घेणार नाही. पंरतु ज्यातून इतरांना त्रास होईल इतरांना अडचणी येतील, असं काही करू नका, असं आवाहनही अजित पवार यांनी यावेळी केलं.
दरम्यान, या मुद्द्यावर देवेंद्र फडणवीस यांनीही संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. मात्र या घटनेचं राजकारण व्हावं हे देखील योग्य नाही. काही पक्षांनी, काही नेत्यांनी तोही प्रयत्न केला हे दुर्दैवी आहे. विशेषत: जाणीवपूर्वक लाठीमाराचे आदेश मंत्रालयातून आले. वरून आले. अशा प्रकारचे नरेटिव्ह तयार करण्याच प्रयत्न झाला. लाठीमार करण्याचे आदेश देण्याचा अधिकार एसपी आणि डीवायएसपी दर्जाच्या अधिकाऱ्यांना असतात. त्यासाठी कुणाच्या आदेशांची गरज नसते, हे या नेत्यांनाही माहिती आहे. मग माझा सवाल आहे की, ज्यावेळी निष्पाप ११३ गोवारी पोलिसांच्या हल्ल्यात मारले गेले तेव्हा तसा आदेश कुणी दिली होता. तो मंत्रालयातून आला होता का, असा सवाल देवेंद्र फडणवीस यांनी विचारला आहे.