मुंबई : मेळघाट व्याघ्रप्रकल्पातील विस्थापित आठ गावांच्या पुनर्वसनासाठी, घरकुल, रस्ते, शौचालये, पाणीपुरवठा आदी विकास योजना राबविण्यात याव्यात, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संबंधित अधिका-यांना सोमवारी दिले.मेळघाट व्याघ्र प्रकल्पग्रस्तांच्या समस्यांबाबत, ‘वर्षा’ निवासस्थानी झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री बोलत होते. प्रकल्पग्रस्तांच्या घरांचा प्रश्न सोडविण्यासाठी, शबरी आवास योजना किंवा प्रधानमंत्री आवास योजनेचा लाभ प्राधान्याने द्यावा. ज्यांना घरकुल उभारण्यासाठी जागा नसेल, त्यांना घरकुलासाठी गायरान जमीन उपलब्ध करून देण्यात यावी. पाणीपुरवठा योजनांसाठी या गावांना मुख्यमंत्री पेयजल योजनेत समावून घेण्याची कार्यवाही करावी, असेही मुख्यमंत्री म्हणाले.तसेच प्रकल्पग्रस्तांच्या कुटुंबीयांना उपजीविका उपलब्ध करून देण्यासाठी, स्व. प्रमोद महाजन कौशल्य व उद्योजकता अभियानांतर्गत प्रशिक्षण कार्यक्रम प्राधान्याने राबविण्यात यावा. सर्व पुनर्वसित गावांमध्ये ग्रामपंचायती निर्माण करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात यावी, अशा सूचना मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिल्या.
मेळघाट प्रकल्पग्रस्तांना प्राधान्याने सुविधा पुरवा, मुख्यमंत्री फडणवीस यांचे निर्देश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2017 5:20 AM