ऑनलाइन लोकमत
नागपूर, दि. 3 - आगामी विविध निवडणुकांमध्ये दिव्यांगांना विनाकष्ट मतदानाचा अधिकार बजावता यावा, यासाठी मतदान केंद्रांवर रॅम्प व लिफ्टसह अन्य आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्यात असे निर्देश महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाने सर्व निवडणूक अधिकाऱ्यांना दिले आहेत. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात ही माहिती सादर करण्यात आली आहे. न्यायालयाने यासंदर्भात आयोगाला विचारणा केली होती. शासकीयइमारतींमध्ये दिव्यांगांसाठी रॅम्प, लिफ्ट, स्वच्छतागृहे, पार्किंग इत्यादी विशेष सुविधा उपलब्ध असाव्यात यासाठी इंद्रधनू या सामाजिक संस्थेने जनहित याचिका दाखल केली आहे. या याचिकेवरील सुनावणीदरम्यान दिव्यांगांना मतदान केंद्रांवरही आवश्यक सुविधा मिळणे गरजेचे असल्याची बाब न्यायालयाच्या निदर्शनास आणून देण्यात आली होती. संस्थेची ही दुसरी जनहित याचिका होय. जुन्या इमारतींमध्ये दिव्यांग व ज्येष्ठ नागरिकांना एक वर्षात नियमानुसार सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील, नवीन इमारतींना नियमाधीन राहूनच परवानगी देण्यात येईल आणि महानगरपालिकेंतर्गत येणाऱ्या पण इतरांच्या मालकीच्या इमारतींमध्ये संबंधित सुविधा उपलब्ध करून देण्यास सांगू, अन्यथा कारवाई करू अशी ग्वाही महानगरपालिकेने दिल्यानंतर न्यायालयाने संस्थेची पहिली जनहित याचिका निकाली काढली होती. परंतु, महानगरपालिकेने ग्वाहीचे पालन केले नाही. परिणामी संस्थेने दुसऱ्यांदा न्यायालयात धाव घेतली आहे. याचिकाकर्त्यातर्फे अॅड. अनुप गिल्डा तर, आयोगातर्फे अॅड. जेमिनी कासट यांनी बाजू मांडली.