तासगाव/ कवठेमहांकाळ : कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत आणि खासदार संजयकाका पाटील यांनी सावळज (ता. तासगाव) व कवठेमहांकाळ तालुक्यातील अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या द्राक्षबागांची पाहणी केली. यावेळी प्रशासनाला तातडीने पंचनामे करण्याचे आदेश देऊन तात्काळ मदत करण्याचे आश्वासन मंत्री खोत यांनी दिले.शनिवारी तासगाव व कवठेमहांकाळ तालका परिसरात वादळी वारे आणि गारपीटीसह अवकाळी पावसाने तडाखा दिला होता. या पावसाने अनेक शेतकऱ्यांच्या द्राक्षबागांचे नुकसान झाले, तर अनेक शेतकऱ्यांच्या बागा उखडून पडल्या. या पार्श्वभूमीवर रविवारी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत आणि खासदार संजयकाका पाटील यांनी सावळज येथे भेट देऊन, येथील नुकसान झालेल्या विजय पाटील आणि सरपंच हेमंत पाटील यांच्या द्राक्षबागेची पाहणी केली. यावेळी विभागीय कृषी सहसंचालक एन. टी. शिसोदे, तहसीलदार सुधाकर भोसले यांच्यासह अधिकारी उपस्थित होते. तसेच येथील मृत शेतकरी विठ्ठल मोरे यांच्या कुटुंबाची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले.यावेळी बोलताना ना. सदाभाऊ खोत म्हणाले, अवकाळी पावसाने तासगाव तालुक्यातील शेतीचे अतोनात नुकसान झाले आहे. सावळज परिसरात गारपीट आणि पावसाने द्राक्षबागांचे नुकसान झाले असून, सर्व बागांचे आणि इतर पिकांचे तातडीने पंचनामे करण्याचे आदेश प्रशासनाला दिले आहेत. दोन दिवसात अहवाल प्राप्त झाल्यानंतर शेतकऱ्यांना तातडीने मदत जाहीर केली जाईल. तसेच मृत विठ्ठल मोरे या शेतकऱ्याच्या वारसांना गोपीनाथ मुंडे शेतकरी विमा योजनेतून मदत देण्याचे आदेश तहसीलदार भोसले यांना त्यांनी दिले.यावेळी खा. संजयकाका पाटील म्हणाले, द्राक्षबागा पडल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. बेदाणाही भिजला असून नवीन छाटलेल्या द्राक्षबागेस गारपीटीने इजा झाल्याने त्यांचेही पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यावेळी विकास सोसायटीचे अध्यक्ष आनंदराव पाटील, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रवक्ते महेश खराडे आदी उपस्थित होते.कवठेमहांकाळ तालुक्यातील माळेवाडी येथील शेतकरी प्रशांत माळी यांची दीड एकर द्राक्षबाग शनिवारी झालेल्या वादळी वाऱ्याच्या तडाख्यात भुईसपाट झाली. त्यामुळे या शेतकऱ्याचे १५ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. रविवारी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, खा. संजयकाका पाटील, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राज्य प्रवक्ते महेश खराडे यांनी भेट दिली. यावेळी मंत्री खोत यांनी नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना शासनपातळीवरून मदत देण्याचे आश्वासन दिले.तसेच घाटनांद्रे येथील शेतकरी सोपान शिंदे यांनी कर्जाला कंटाळून शनिवारी आत्महत्या केली होती. मंत्री खोत व खा. पाटील यांनी त्यांच्या घरीही भेट देऊन त्यांच्या कुटुंबाला मदत करण्याची ग्वाही दिली. तसेच नांगोळे येथे घराचे पत्रे उडालेल्या लोकांच्या घरीही मंत्री खोत यांनी भेट दिली. यावेळी त्यांच्यासोबत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राज्य प्रवक्ते महेश खराडे, सूरज पाटील, शिवाजी पाटील, अशोक खाडे, जोतिराम जाधव, सचिन पाटील, अक्षय बनसर, किरण इंगवले यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आदी उपस्थित होते. (वार्ताहर)शेतकऱ्यांसाठी सर्व ती मदतनुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनपातळीवरून मदत देण्यासाठी प्रयत्न करू. तसेच घाटनांद्रे (ता. कवठेमहांकाळ) येथील आत्महत्या केलेल्या सोपान शिंदे या शेतकऱ्याच्या कुटुंबाला मदत मिळवून देण्याचे आश्वासन कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी दिले. शनिवारी झालेल्या वळवाच्या पावसाने व वादळी वाऱ्याने तालुक्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. याची पाहणी करण्यासाठी व त्या शेतकऱ्यांना भेट देण्यासाठी मंत्री खोत आले होते, यावेळी ते बोलत होते. यावेळी त्यांच्यासोबत खा. संजयकाका पाटील होते.
शेतकऱ्यांना शासनाकडून तात्काळ मदत देणार
By admin | Published: April 02, 2017 11:46 PM