मुंबई: राज्यात सध्या उसदराचा प्रश्न निर्माण झाला असताना सरकारमधील मंडळीच तोडफोड करू लागली आहेत. आपण मंत्री असताना तीनवेळा साखर निर्यातीला अनुदान देऊन बाजारभाव नीट राहील याची काळजी घेतली. आतादेखील या सरकारने निर्यातीचे अनुदान तातडीने सुरू करावे आणि त्यानंतरही जी साखर उरेल त्यासाठी प्रति टन ६०० ते ७०० रुपये अनुदान द्यावे, अशी मागणी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी सरकारकडे केली. उसाच्या प्रश्नावर सहकारमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलेली वक्तव्ये वाचून ते खूप ज्ञानी असावेत असा माझा समज झाला आहे, असा मार्मिक टोलाही त्यांनी लगावला. किमान वाजवी किंमत न देणाऱ्या साखर कारखान्यांची साखर गोदामे ताब्यात घेतली जातील, असे वक्तव्य सहकारमंत्री पाटील यांनी दोन दिवसांपूर्वी केले होते. त्यावर शुक्रवारी पत्रकार परिषद घेऊन पवार यांनी जोरदार फटकेबाजी केली. सहकार आणि पणन विभाग सांभाळणा-या या मंत्र्यांना आता साखर विक्री व वितरण हा नवा विभाग देखील काढून द्यावा असा उपरोधिक सल्लाही त्यांनी दिला. पवार म्हणाले, साखरेची निर्यात थांबल्यामुळे दराचा प्रश्न निर्माण झाला आहे. १२ जानेवारी पर्यंत ३७८ लक्ष ११ हजार टन उसाचे गाळप झाले आहे आणि अद्याप ५०० लक्ष टन उसाचे गाळप होणे बाकी आहे. शेतात उभा असलेला ऊस तातडीने गाळपासाठी घेतला पाहिजे. पण ज्यांनी आजवर या प्रश्नावर संघर्षाचे वातावरण तयार केले, तेच आता शेतकऱ्यांच्या पैशातून उभारलेल्या साखर संकुलावर हल्ला करत आहेत, असा टोमणाही त्यांनी खा. राजू शेट्टी यांना लगावला.सहकारमंत्री पाटील यांनी कधी कोणत्या विषयावर अभ्यासपूर्ण भाषण केल्याचे मी कधीही वाचलेले नाही. मात्र उसाच्या प्रश्नावरुन त्यांनी केलेली विधाने वाचूृन ते खूपच ज्ञानी व्यक्ती आहेत असे मला वाटते. गोदामांमधील साखर सरकार ताब्यात घेईल असे ते म्हणाल्याचे मी वाचले आहे. त्यांनी हे काम तातडीने करावे, जेणे करुन गोदामे रिकामी होतील. चांगला भाव येईपर्यंत साखर सांभाळण्याचा खर्च वाचेल सरकारने ती साखर विकून जो पैसा येईल त्यातून वर्षभर कारखान्यांचा खर्च सरकारनेच भागवावा, असा उपरोधिक सल्लाही पवार यांनी दिला. (विशेष प्रतिनिधी)
साखर निर्यातीसाठी तातडीने अनुदान द्या - पवार
By admin | Published: January 16, 2015 6:23 AM