मुंबई : महिला, तरुणींच्या छेडछाड व अत्याचाराच्या प्रमाणात वाढ होत असून, त्याला प्रतिबंध घालण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात छेडछाडविरोधी पथक संपूर्ण सक्रीय केले करावे. त्याचबरोबर मुंबईतील १०३ हेल्पलाइनप्रमाणे संपूर्ण महाराष्ट्रात एक टोल फ्री क्रमांक सुरू करावा, आदी मागण्या राज्य महिला आयोगाच्या सदस्या आणि राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांनी सोमवारी पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांच्याकडे केली. महिलांच्या सुरक्षेच्या संदर्भात महासंचालक प्रवीण दीक्षित यांची भेट घेऊन विविध यावेळी विषयासंबंधी लक्ष वेधले. तालुक्याच्या ठिकाणी पोलीस ठाण्यांच्या आवारात समुपदेशन केंद्रांसाठी जागा उपलब्ध करून देण्याचे राज्य सरकारचे निर्देश आहेत. तरीदेखील या निर्णयाची अंमलबजावणी अनेक ठिकाणी झालेली नाही. त्यासाठी पोलीस ठाण्याच्या आवारात जागा उपलब्ध करून द्यावी. लहान मुली आणि महिलांवर होणाऱ्या लैंगिक अत्याचारांच्या वाढत्या संख्येबाबत चिंता व्यक्त करीत, या गंभीर प्रश्नाबाबत जनजागृतीचे काम होणे गरजेचे आहे. त्यासाठी पोलीस मित्र व महिला दक्षता कमिटीचेही सहकार्य घ्यावे, अशी सूचना त्यांनी केली.पोलिसांकडून होते गैरवर्तणूक- गेल्या काही दिवसांत पोलिसांकडून महिलांशी गैरवर्तवणुकीचे प्रकार घडल्याचेही आढळले आहेत. पोलिसांकडून अधिकाराचा गैरवापर होणारे प्रकार त्वरित थांबले पाहिजेत, अशी आग्रही भूमिक चित्रा वाघ यांनी मांडली. यावर महासंचालकांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. - महिलासंबंधी समस्या सोडवण्यासाठी लवकरात लवकर कार्यवाही करण्याचे आश्वासन त्यांनी यावेळी दिले. यावेळी पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांच्यासह विशेष महानिरीक्षक सर्वश्री प्रभात कुमार व रवींद्र सिंघल उपस्थित होते.14% महिला पोलिसांची संख्या राज्यात आहे. मात्र, त्यांना पुरेशी स्वच्छतागृहे, तसेच गणवेश बदलण्यास (चेंजिंग रूम) मूलभूत सुविधा उपलब्ध नाहीत.
महिला सुरक्षेसाठीच्या राज्यात एकच हेल्पलाइन द्या
By admin | Published: December 01, 2015 3:57 AM