नवी मुंबई : राज्यातील नागरिकांना माफक दरामध्ये दर्जेदार आरोग्य सुविधा पुरविण्याचे ध्येय हाती घेण्यात आले असून, आधुनिक तंत्रज्ञानाचा पुरेपूर वापर केला जात असल्याची प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली. सीबीडीतील पारसिक हिल येथे अपोलो रुग्णालयाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. भविष्यात माफक दरात उत्तमोत्तम आरोग्य सेवा पुरविण्यासाठी शासन प्रयत्नशील असून, त्या दृष्टीने सकारात्मक पाऊल उचलले जात असल्याची प्रतिक्रिया फडणवीस यांनी व्यक्त केली. आरोग्य मंत्र्यांसमोरील सर्वात मोठे आव्हान म्हणजे ग्रामीण भागात डॉक्टर उपलब्ध करून देणे. पण जर डॉक्टर रुग्णांपर्यंत पोहोचू शकत नसतील तर अशा ठिकाणी तंत्रज्ञानाचा वापर करून रुग्णापर्यंत डॉक्टरांना पोहोचविता येऊ शकते, असे मुख्यमंत्री म्हणाले. कार्यक्रमाला राज्यपाल विद्यासागर राव, आरोग्य मंत्री दीपक सावंत यांची प्रमुख उपस्थिती होती. भारतातील डॉक्टर्स आणि सर्जन्स जगात सर्वोत्तम असल्याची प्रतिक्रिया व्यक्त करत राज्यपाल विद्यासागर राव यांनी देशातील डॉक्टरांची प्रशंसा केली. परदेशातून भारतात उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत असून जवळपास २३ ते २५ टक्के रुग्ण भारतात उपचारासाठी येत असल्याचे दिसून येते, असेही राव यांनी स्पष्ट केले. अत्याधुनिक सेवा-सुविधा पुरविणाऱ्या अपोलो हॉस्पिटलच्या कामगिरीचा आढावा याठिकाणी घेण्यात आला. अपोलो रुग्णालयाने स्वत:चे मेडिकल कॉलेज, नर्सिंग कॉलेज सुरू करावे जेणेकरून भविष्यात चांगले डॉक्टर उपलब्ध होतील, अशी सूचनाही राज्यपालांकडून करण्यात आली. यावेळी अपोलो हॉस्पिटलचे अध्यक्ष डॉ. प्रथाप सी. रेड्डी, व्यवस्थापकीय संचालक सुनीता रेड्डी,उपाध्यक्ष प्रिथा रेड्डी आदी मान्यवर उपस्थित होते. (प्रतिनिधी)
माफक दरात दर्जेदार आरोग्य सुविधा देणार
By admin | Published: November 15, 2016 6:08 AM