मुंबई : शिवसेनेतील आमचाच गट अधिकृत आहे आणि अजय चौधरी यांच्या गटाकडे दोन तृतीयांश आमदार संख्या नसल्याने त्यांची गटनेतेपदी केलेली नियुक्ती रद्द करावी. सोबतच्या आमदारांना अपात्र ठरवावे, अशी भूमिका एकनाथ शिंदे गटाकडून उच्च न्यायालयात मांडण्यात येणार आहे.शिंदे गटाकडून मिळालेल्या माहितीनुसार ते असा दावा करणार आहेत, की शिंदे यांच्या नेतृत्वात आम्ही स्वतंत्र गट स्थापन केलेला नाही. शिंदे हे आधीपासूनच शिवसेना गटनेते होते. आम्ही त्यांच्या मुख्य उपस्थितीत एक बैठक घेतली आणि केवळ प्रतोद बदलले. आधी सुनील प्रभू हे प्रतोद होते, त्यांच्या जागी आम्ही भरत गोगावले यांची नियुक्ती केली. त्यामुळे आमच्याकडे दोन तृतीयांश सदस्य आहेत की नाही, हे सिद्ध करण्याची कायद्याने आमची जबाबदारी नाही.
गट त्यांनी स्थापन केला आहे आणि तो आता अधिकृत मानायचा तर त्यांच्याकडे शिवसेनेचे ५५ पैकी ३७ आमदार असायला हवेत. ३७ आमदारांचे पाठबळ सिद्ध करण्याचे आदेश अजय चौधरी यांच्या नेतृत्वातील गटाला द्यावेत. ते सिद्ध करू शकले नाहीत तर पक्षांतर बंदी कायद्यानुसार उपाध्यक्षांनी त्यांच्या गटास दिलेली मान्यता रद्द करावी.