मुंबई - दिल्लीत येणाऱ्या साहित्यिक आणि मराठी अभ्यासकांना हक्काची जागा असावी यासाठी मराठी सांस्कृतिक भवन उभारण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असून, त्यासाठी निधीची तरतूदही करण्यात आली आहे.
फेब्रुवारीत दिल्लीत पार पडलेल्या साहित्य संमेलनाच्या सांगता समारोप कार्यक्रमाला संमेलनाच्या अध्यक्षा डॉ. तारा भवाळकर यांच्यासह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार आणि ‘लोकमत’च्या एडिटोरियल बोर्डाचे चेअरमन व माजी खासदार डॉ. विजय दर्डा उपस्थित होते. त्यावेळी बोलताना दर्डा यांनी मराठी माणसाला आपलेसे वाटेल अशी वास्तू दिल्लीत असायला हवी, याकडे सरकारचे लक्ष वेधले होते. त्याचवेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नवी दिल्लीत भव्य मराठी सांस्कृतिक भवन उभारण्याची घोषणा करून त्यासाठी अर्थसंकल्पात निधीची तरतूद करण्याचेही जाहीर केले होते.
दिल्लीत भव्य मराठी सांस्कृतिक भवन उभारण्यासाठी निधीची तरतूद केली असून, आणखी निधी लागल्यास जूनमध्ये होणाऱ्या पावसाळी अधिवेशनात पुरवणी मागण्यात त्याची तरतूद केली जाईल.- अजित पवार, उपमुख्यमंत्री
जागा निश्चित करणारराज्य सरकारने अर्थसंकल्पात मराठी भाषा विभागासाठी २२५ कोटी रुपयांची तरतूद केली आहे. त्यापैकी १३७ कोटी ५० लाख रुपये हे बांधकामासाठी आहेत.मुंबईतील चर्नी रोड येथील मराठी भाषा भवन, नवी मुंबईतील उपकेंद्र, वाई येथील विश्वकोष केंद्र व मराठी भाषा विभागाच्या काही कार्यालयांच्या दुरुस्ती व दिल्लीतील मराठी साहित्यिक भवनासाठी हा निधी खर्च केला जाणार आहे. दिल्लीत मराठी साहित्यिक भवनासाठी जागा अंतिम करण्याचे काम सध्या सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले.