- दयानंद पाईकराव, नागपूरकेंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी सादर केलेल्या रेल्वे अर्थसंकल्पात विदर्भातील महत्त्वाच्या वर्धा-यवतमाळ-नांदेड या नव्या रेल्वेमार्गासाठी १५० कोटींची तरतूद करून सर्वाधिक वर्दळीच्या नागपूर-वर्धा मार्गावर चौथ्या नव्या मार्गाच्या कामाला मंजुरी दिली आहे. याशिवाय अजनी रेल्वेस्थानकाला सॅटेलाइट टर्मिनलच्या रूपाने विकसित करण्याची घोषणा केली असून, या प्रकल्पाची किंमत ४१.६२ कोटी रुपये आहे.प्रभू यांनी विदर्भातील जुन्या प्रकल्पांसाठी भरघोस निधी उपलब्ध करून दिलेला आहे. ‘लोकमत’च्या एडिटोरीयल बोर्डाचे चेअरमन खासदार विजय दर्डा यांनी वर्धा-यवतमाळ-नांदेड या रेल्वेमार्गासाठी सातत्याने पाठपुरावा केला आहे. यंदाच्या अर्थसंकल्पात या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी १५० कोटी रुपयांची तरतूद केल्यामुळे, हा प्रकल्प मार्गी लागला आहे. नागपूर-सेवाग्राम या मार्गावर सध्या अप आणि डाउन या दोन रेल्वेलाइन आहेत. या रेल्वे रुळाची क्षमता १०० रेल्वेगाड्या चालविण्याची असताना, येथून १५० रेल्वेगाड्या चालविण्यात येत आहेत. त्यामुळे येथे तिसऱ्या मार्गाची घोषणा करण्यात आली होती, परंतु तिसरा आणि चौथ्या मार्गासाठी जवळपास तेवढाच खर्च येत असल्यामुळे, अर्थसंकल्पात नागपूर-वर्धा चौथ्या मार्गाची घोषणा करण्यात आली आहे. या अर्थसंकल्पात दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात सुरू असलेल्या जबलपूर-गोंदिया या नव्या रेल्वेमार्गासाठी २२३ कोटी रुपये, छिंदवाडा-नागपूर ब्रॉडगेजसाठी १५० कोटी रुपये, नागपूर-नागभीड ब्रॉडगेजसाठी २५ कोटी, कळमना-नागपूर डबलिंगसाठी १० कोटी, दुर्ग-राजनांदगाव डबलिंगसाठी ५६ कोटी, राजनांदगाव-नागपूर तिसऱ्या मार्गासाठी १६० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
१५० कोटींच्या निधीची तरतूद
By admin | Published: February 26, 2016 1:08 AM