- आशिष सिंहमुंबई : कट्टरपंथी पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या (पीएफआय) अटक केलेल्या सदस्यांकडून जप्त करण्यात आलेल्या आक्षेपार्ह सामग्रीत ‘३६५ डेज थ्रू अ थाऊजंड कटस’ (ऑपरेशन बुकलेट) हा प्रक्षोभक मजकूर असलेला दस्तावेज सापडला असून, यात भारताच्या स्वातंत्र्याला शंभर वर्षे पूर्ण होईपर्यंत म्हणजे २०४७ सालापर्यंत भारत हे इस्लामिक राष्ट्र कसे करता येईल, याची तपशीलवार योजनाच सादर केली आहे. पीएफआय सदस्यांविरोधातील दहशतवाद विरोधी पथकाच्या (एटीएस) आरोपपत्रात याचा समावेश आहे.
खासगी वितरणासाठीचा हा दस्तावेज मुंबईतून अटक करण्यात आलेला आरोपी मजहर याच्या मोबाईलमधून हस्तगत करण्यात आला आहे. यात भारतातील मुस्लिमांचा इतिहास, त्यांची दयनीय अवस्था, अल्पसंख्याक असल्याने भेदभावामुळे होऊ न शकणारी प्रगती, वेगवेगळ्या मुस्लिम संघटनांमधील आपापसांतील विरोध, गुजरातमधील दंगलीनंतर मुस्लिमांवर होणाऱ्या अत्याचारांचा उल्लेख करीत २०४७ सालापर्यंत पाच-पाच वर्षांच्या टप्प्यात कोणकोणती पावले उचलायची, याबाबत संघटनेच्या सदस्यांना मार्गदर्शन करण्यात आले आहे. शिक्षण क्षेत्रापासून ते संसदेत आपली ताकद कशी वाढवायची, तसेच व्यवस्थेत प्रत्येक ठिकाणी असलेल्या मुस्लिमाने या लढाईत कसा सहभाग घ्यायचा, याबाबतही सूचना करण्यात आल्या आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार सत्तेवर आल्यापासून अल्पसंख्याकांवरील अत्याचारांमध्ये वाढ झाली आहे. नरेंद्र मोदी यांची प्रतिमा विकासाचे दूत अशी करण्यात आली असून, गुजरातमधील दंगलीनंतर त्यांची प्रतिमा बदलण्यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमिका असल्याचे यात नमूद करण्यात आले आहे.
लव जिहाद, घरवापसी nप्रवीण तोगडिया, सुब्रम्हण्यम स्वामी, गिरीराज सिंह, योगी आदित्यनाथ, साध्वी निरंजन ज्योती, स्वाध्वी प्राची, साक्षी महाराज, संजय राऊत या नेत्यांच्या वक्तव्याबाबतही आक्षेप घेण्यात आले आहेत. nलव जिहाद आणि घरवापसीच्या नावाखाली मोहीम चालविली जात असल्याचा आरोप यात करण्यात आला आहे. एटीएसने तपासातून हाती आलेले प्रक्षोभक मजकुराचे पुरावे, साक्षीदार यांचा समावेश आरोपपत्रात केला असून, खटल्याशी संबंधित महत्त्वपूर्ण बाबींची नोंद घेण्यात आली आहे. - महेश पाटील, उपमहानिरीक्षक, दहशतवाद विरोधी पथक