मुंबई : दहावी-बारावीच्या ऑफलाइन परीक्षेविरोधात विकास फाटक ऊर्फ हिंदुस्थानी भाऊच्या सोशल मीडियावरील चिथावणीखोर वक्तव्याला प्रतिसाद देत सोमवारी मुंबईसह राज्यातील मोठ्या शहरांमध्ये हजारो विद्यार्थी रस्त्यावर उरतल्याने मोठा तणाव निर्माण झाला. अनेक ठिकाणी पोलिसांनी सौम्य लाठीमार करत गर्दी पांगवली. धक्कादायक म्हणजे, दोन दिवसांपूर्वीच या आंदोलनाच्या स्थळासह वेळेबाबतची माहिती सोशल मीडियाद्वारे देण्यात आली होती; मात्र याबाबत मुंबई पोलिसांसह राज्य गुप्तचर विभाग मात्र अनभिज्ञ असल्याचे दिसून आले.ज्या पालकांना आपली मुले असे आहे करत आहेत, हे माहिती नव्हते. ते पालक आता आपल्या मुलांवर गुन्हे तर दाखल होणार नाहीत ना? या चिंतेत आहेत.
सोमवारी दुपारी १२ वाजेपासून शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांच्या मुंबईतील निवासस्थानाजवळ विद्यार्थ्यांची गर्दी जमण्यास सुरुवात झाली. त्यानंतर एकच्या सुमारास हिंदुस्थानी भाऊनेही तेथे हजेरी लावून चिथावणीखोर वक्तव्य केले. ही विद्यार्थ्यांची ताकद आहे. विद्यार्थ्यांच्या विविध मागण्याबाबतचे निवेदन शिक्षण मंत्र्याना देत आहे. एवढे करून दुर्लक्ष केल्यास यापेक्षा मोठ्या प्रमाणात गर्दी येथे दिसून येईल. हे सगळे हक्काच्या लढाईसाठी उभे असल्याचे नमूद करत गर्दीचा व्हिडिओ फाटक याने शेअर केला. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने दुपारी गर्दीत आणखी भर पडली. दुपारी ३ वाजेपर्यंत येथे हजारो विद्यार्थ्यांचा जमाव जमल्याने परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले.पोलिसांनी अधिकचा फौजफाटा तैनात केला. पोलीस उपायुक्त प्रणय अशोक यांनी आंदोलनस्थळी धाव घेत विद्यार्थ्यांना समजावण्याचा प्रयत्न केला; मात्र त्यांचा गोंधळ कायम होता. आम्हाला न्याय हवा म्हणत, त्यांची घोषणाबाजी सुरू होती. काही जणांनी हातात दगड घेतल्याचे समजताच पोलिसांकडून बळाचा वापर करत गर्दीला पांगविले. यावेळी पोलिसांनी सौम्य लाठीमार केला. याप्रकरणी धारावी पोलिसांकडून हिंदुस्थानी भाऊसह जमावाविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.
दोन दिवसांपूर्वीच तांडव करण्याची भाषाहिंदुस्थानी भाऊने, शनिवारी सोशल मीडियावर लाइव्ह येत, आंदोलनाची माहिती दिली होती. परीक्षेबाबत योग्य निर्णय न घेतल्यास मुंबईसह हिंदुस्थानमध्ये तांडव करणार आहे. माझ्यावर अटकेची कारवाई केली तरी भीती नाही. हे शासन आपले म्हणणे एकत नसेल तर आपण एकत्र येत याविरोधात आवाज उठवायला हवा. मी ३१ तारखेला १२ वाजता वर्षा गायकवाड यांच्या घराबाहेर आंदोलन करणार आहे. त्यानुसार, तरुणाईने एकमेकांना सहकार्य करत, आपण हे युद्ध जिंकू म्हणत सायन धारावी परिसरात येण्याचे आवाहन करण्यात आले होते.
प्रश्न चिघळेल, असे मुलांनी काही करू नयेआंदोलनाचे पाऊल योग्य नाही. आंदोलक मुले अठरा वर्षांखालील आहेत. त्यामुळे त्यांना चिथावणी देणाऱ्यांनी विचार करावा. प्रश्न चिघळेल, असे करू नये. मुलांचे आरोग्य, त्यांची सुरक्षितता, अभ्यासाची स्थिती याचा विचार करूनच राज्य सरकार निर्णय घेईल.- वर्षा गायकवाड, शालेय शिक्षण मंत्री
तपास सुरू...काही विद्यार्थ्यांना समजावून घरी पाठवण्यात आले आहे. याच गर्दीत विद्यार्थ्यांव्यतिरिक्त काही जणांनी कायदा व सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण करण्याचा प्रयत्न केला. त्यांनाही बळाचा वापर करत पांगवण्यात आले आहे. विद्यार्थ्याच्या चौकशीतून समोर आलेल्या व्यक्तीविरुद्ध गुन्हा नोंदवून शोध सुरू आहे.- प्रणय अशोक, पोलीस उपायुक्त