राजेश भिसे, जालनाउत्तरपत्रिका रॅकेटची व्याप्ती वाढत चालली असून मानसशास्त्राच्या प्राध्यापकाकडे भूगोल विषयाच्या उत्तरपत्रिका पाठविण्यात आल्याचे उघडकीस आले आहे. या प्राध्यापकाच्या लहान भावाला सोमवारी पहाटे पोलिसांनी अटक केली. राजूर येथील प्रख्यात महाविद्यालयातील अन्य एका प्राध्यापकालाही चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. तालुका जालना पोलिसांनी अंबड रस्त्यावरील संस्कार वसतिगृहावर छापा टाकून शुक्रवारी रात्री पुनर्लेखन केलेल्या, कोऱ्या उत्तरपित्रका व होलोक्राफट जप्त केले होते. याआधी याप्रकरणात श्रीमंत वाघ आणि प्रा. अंकुश पालवे यांना अटक झाली आहे. बोर्डाचे अधिकारी आणि पोलिसांच्या चमूने जप्त केलेल्या ६०० उत्तरपत्रिकांची तपासणी सोमवारी करण्यात आली. पैकी १५० उत्तरपत्रिकांमध्ये विविध प्रकारच्या खुणा आढळून आल्या आहेत.जालना, परभणी आणि औरंगाबाद जिल्ह्यातील जवळपास शंभर विद्यार्थी पोलिसांच्या रडारवर असून, त्यांचीही चौकशी केली जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. जालना आणि परभणी जिल्ह्यातील नामांकीत महाविद्यालयांतील प्राध्यापकही या प्रकरणात सहभागी असल्याची विश्वसनीय माहिती आहे. राणीउंचेगाव येथील इंदिरा गांधी कनिष्ठ महाविद्यालयात तासिका तत्वावर कार्यरत असलेला प्राध्यापक गेल्या काही दिवसांपासून आजारी आहे. त्यामुळे त्याच्या नावाने बोर्डाकडून आलेले पेपर त्याचा लहान भाऊ सुदीप राठोड हाच हाताळत होता. त्याला सोमवारी न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.
मानसशास्त्राच्या प्राध्यापकाकडे भूगोलचे पेपर!
By admin | Published: March 22, 2016 4:12 AM