पुणे : ग्वाल्हेर घराण्याचे ज्येष्ठ गायक आणि संगीत गुरू पं. मोहनराव कर्वे यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. ते ८९ वर्षांचे होते. त्यांच्या मागे पत्नी, तीन मुली आणि सून, असा परिवार आहे. प्रसिद्ध गायिका मंजिरी कर्वे-आलेगावकर यांचे ते वडील होत. पं. कर्वे यांच्या पार्थिवावर वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. पं. मोहनराव कर्वे यांचा जन्म १६ सप्टेंबर १९२५ रोजी झाला. वडिलोर्पाजित पीठगिरणीचा व्यवसाय सांभाळून त्यांनी आपले जीवन संगीत सेवेसाठी वाहून घेतले. वयाच्या सहाव्या वर्षी ‘सरस्वती सिनेटोन’च्या ‘भक्त प्रल्हाद’ चित्रपटात त्यांनी भक्त प्रल्हादाची भूमिका साकारली होती. मात्र, चित्रपटापेक्षाही संगीताकडेच त्यांचा जास्त ओढा होता. गायनाचार्य पं. रामकृष्णबुवा वझे, हरिभाऊ घांग्रेकर आणि गानकलानिधी मा. कृष्णराव यांचा सांगीतिक सहवास आणि मार्गदर्शन मोहनरावांना लाभले. गांधर्व महाविद्यालयाची संगीत अलंकार पदवी संपादन करणारे ते पहिले गायक ठरले. आकाशवाणीचे ते मान्यताप्राप्त गायक होते.पं. जसराज पुरस्कार, पं. रामकृष्णबुवा वझे स्मृती संगीत शिक्षक पुरस्कार, पं. विष्णू दिगंबर पलुस्कर पुरस्कार आणि आबासाहेब मुजुमदार पुरस्कार अशा पुरस्कारांचे ते मानकरी ठरले. शारदाज्ञानपीठम् संस्थेतर्फे ॠषितुल्य गुरू आणि मित्र फाउंडेशनतर्फे त्यांचा सन्मान करण्यात आला होता. पं. मोहनराव कर्वे यांनी मंजिरी कर्वे-आलेगावकर, प्रियल साठे, वर्षा तेंडुलकर, जुई टेंभेकर, शेखर महाजन, आनंद पारखी, संवादिनी कुमार करंदीकर आणि चैतन्य कुंटे असे अनेक शिष्य घडविले. (प्रतिनिधी)