प्राची सोनवणे,
नवी मुंबई- प्रकल्पग्रस्त तरूणांनी सिडको व शासनाच्या अन्यायाविरोधात चळवळ उभारण्यास सुरवात केली आहे. दहीहंडी उत्सवाच्या माध्यमातूनही तरूणांनी लोकनेते दि. बा. पाटील यांची प्रतिमा असलेले होर्डिंग घेवून हंड्यांना सलामी दिली. आमची मागणी एकच हाय, घरे अधिकृत करता की न्हायच्या घोषणा देवून तरूणांनी शहरामध्ये जनजागृती केली. नेरूळ गावातील तरूणांनी दहीहंडी उत्सवाच्या माध्यमातून प्रकल्पग्रस्तांच्या चळवळीविषयी जनजागृती करण्याचा हा उपक्रम राबविला. येथील तरूण कार्यकर्ते देवनाथ म्हात्रे यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबविण्यात आला. आम्ही नेरूळकर नावाच्या पथकाने दि. बा. पाटील यांची प्रतिमा हातात घेवून शहरभर रॅली काढली. गोविंदांचा एकच निर्धार प्रकल्पग्रस्तांना घराचा अधिकार, आमची मागणी एकच हाय, घरे अधिकृत करता की न्हाय, आमच्या जागेवरच करणार आमचे घर अधिकृत, फोडू हंडी रचू थरावर थरच्या घोषणा देत शहरवासीयांचे लक्ष गरजेपोटी बांधलेल्या घरांच्या समस्येकडे वेधले. दहीहंडी फोडण्यासाठी मनोरा उभा केल्यानंतर शेवटच्या थरावरील तरूणाच्या हातामध्ये दि. बा. पाटील यांची प्रतिमा व त्यावर आय सपोर्ट पीएपीचा फलक झळकाविला होता. आगरी कोळी युथ फाऊंडेशनने सण व उत्सवांमधून आगरी कोळी संस्कृतीचे व आतापर्यंतच्या लढ्याचे प्रतिबिंब दिसेल असे उपक्रम राबवा असे आवाहन केले होते. संघटनेचे अध्यक्ष नीलेश पाटील यांनीही याविषयी सर्व प्रकल्पग्रस्त तरूणांना आवाहन केले होते. त्या आवाहनाला प्रतिसाद देवून नेरूळकरांनी राबविलेल्या उपक्रमाचे शहरवासीयांनीही कौतुक केले. नवी मुंबईमधील प्रकल्पग्रस्त तरूणाईने दि.बा. पाटील यांनी उभारलेली चळवळ वाढविण्याचे व पुढे घेवून जाण्याचा संकल्प केला आहे. प्रत्येक प्रकल्पग्रस्तांना दि. बां. च्या कर्तृत्वाची सखोल माहिती असावी. हुतात्म्यांचे रक्त वाया जात नाही व वाया जावूही द्यायचे नसते हा त्यांचा विचार प्रत्येकामध्ये रूजविण्यासाठी प्रयत्न सुरू आहे. पूर्ण आयुष्य नि:स्वार्थपणे फक्त आणि फक्त प्रकल्पग्रस्तांच्या हक्कासाठी लढण्यात घालविणाऱ्या या लोकनेत्याच्या स्मृती प्रेरणादायी ठरत आहे. सुशिक्षित तरूणही या चळवळीशी जोडला जात आहे. >चळवळीची वाटचाल दहीहंडीबरोबर गणेशोत्सवामध्येही प्रकल्पग्रस्तांच्या चळवळीला उजाळा देणारे उपक्रम राबविले जाणार आहेत. जासईच्या लढाईत शहीद झालेले हुतात्मे, साडेबारा टक्के योजना, सेझ व विमानतळबाधितांसाठी दिलेला लढा, जेएनपीटी प्रकल्पग्रस्तांसाठी दिलेल्या लढ्यांविषयी माहिती शहरवासी व प्रकल्पग्रस्तांच्या भावी पिढीपर्यंत पोहचविली जाणार आहे. समाजबांधवांमध्ये जनजागृतीसाठी हे उपक्र म राबविले जात आहेत.