ऑनलाइन लोकमतनागपूर, दि. १८ : उपराजधानीला उन्हाचा जोरदार तडाखा बसत असून नागरिक उकाड्याने अक्षरश: हैराण झाले आहेत. पुढील काही दिवस पारा तापलेलाच राहणार असल्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या आरोग्याला फटका बसू नये यासाठी नागपूर महानगरपालिकेने पुढाकार घेतला आहे. मनपाकडून उष्माघात प्रतिबंधात्मक उपाययोजना हाती घेण्यात आल्या असून ३० जूनपर्यंत हा आराखडा आरोग्य व उद्यान विभागामार्फत राबविला जाणार आहे. उपाययोजना राबविण्याची जबाबदारी झोन कार्यालयांवर सोपविण्यात आली आहे. सेवाभावी संस्था, बँका, स्थानिक लोकप्रतिनिधी यांच्या सहभागातून शहराच्या विविध भागात २३६ प्याऊ सुरू करण्यात आले आहेत.
उष्माघात होऊ नये यासाठी जनजागृतीवर भर देण्यात आला आहे. रेल्वे स्टेशन, स्टारबस डेपो, स्टार बसेस, महापालिके ची कार्यालये, आॅटो यावर जनजागृतीचे स्टीकर्स लावण्यात आले आहेत. शहरातील झोपडपट्ट्यात प्रबोधनात्मक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. तसेच रामनवमी, हनुमान जयंतीनिमित्त काढण्यात आलेल्या रथयात्रातही आरोग्य विभागाच्या माध्यमातून जनजागृती करण्यात आली. उपाययोजना संदर्भात झोन कार्यालयांना मुख्यालयांना दररोज माहिती पाठविण्याच्या सूचना दिल्या आहेत. पिण्याच्या पाण्याचे प्याऊ सुरू करण्यासाठी सेवाभावी संस्थांना आवाहन केले होते. याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. उष्माघातासंदर्भात शहरातील झोपडपट्ट्यांत जनजागृती केली जात आहे. उद्याने दिवसभर राहणार खुली४३ अंश सेल्सिअसपेक्षा अधिक तापमान असल्यास नागरिकांना थंड विसावा मिळावा यासाठी सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत उद्याने उघडे ठेवून पिण्याचे पाणी उपलब्ध करण्याच्या सूचना दिल्या आहेत. काही उद्यानात सामाजिक संस्थांनी प्याऊ सुरू केले आहेत. उष्माघातापासून बचाव करण्यासाठी जनजागृतीवर भर देण्यात आला आहे. यासाठी प्रशिक्षणासोबतच सार्वजनिक ठिकाणी व आॅटोवर स्टीकर लावण्यात आल्याची माहिती आरोग्य विभागातील डॉ. विजय जोशी यांनी दिली. ११०० लोकांना प्रशिक्षणउष्माघातापासून बचाव करण्यासाठी करावयाच्या उपायोजनांची माहिती व्हावी, यासाठी महापालिकेच्या आरोग्य विभागामार्फत जनजागृती केली आहे. यात ११०० लोकांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. यात वाहतूक पोलीस, अंगणवाडी सेविका, आरोग्य विभागातील कर्मचारी व इतर विभागाच्या कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.उष्माघात टाळण्यासाठी उपाययोजना ज्या दिवशी नागपूर शहराचे तापमान ४३ अंश सेल्सिअस पेक्षा अधिक असेल त्या दिवशी उन्हात जाऊ नये, डोक्याला कापड बांधावे. भरपूर थंड पाणी प्यावे व उन्हात काम करण्याचे टाळावे. उष्माघात झाल्यास तातडीने उपचार घ्यावे. गरज भासल्यास १०८ क्रमांकावर फोन करून अॅम्बुलन्सची मदत घ्यावी, अशा सूचना मनपाकडून देण्यात आल्या आहेत.