मुंबई : अल्पावधीत पैसे दुप्पट-तिप्पट करण्याचे आमिष दाखवत गुंतवणूकदारांना लुबाडण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. अशा फसव्या कंपन्यांना आळा बसावा यासाठी केबल टीव्ही, एफएम आणि वृत्तपत्रांतील जाहिरातींच्या माध्यमातून जनजागृती करण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत लेखी उत्तरादरम्यान दिली. आर्थिक फसवणूक करणाऱ्या बोगस कंपन्यांवर कारवाई करण्याबाबतचा तारांकित प्रश्न गिरीशचंद्र व्यास, शोभाताई फडणवीस आदी सदस्यांनी विचारला होता. ५५ हजार कोटींच्या गैरव्यवहार प्रकरणी पर्ल्स कंपनीचा म्होरक्या निर्मलसिंग भांगू आणि त्याच्या साथीदारांना सीबीआयने ताब्यात घेतले आहे. मात्र, अद्याप या कंपनीच्या एजंटवर कोणतीच कारवाई करण्यात आली नसल्याचा आरोप सदस्यांनी केला. यावर संचयनी, संजीवनी, शांतिदूत, कल्पवृक्ष, कामधेनू, निसर्ग फॉरेस्ट, पर्ल्स ग्रीन, अनुभव प्लांटेशन, सुमन मोटेल्स आदी विविध कंपन्यांच्या विरोधात आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी राज्यभर ३३ गुन्हे दाखल झाले आहेत. तसेच कल्पवृक्ष मार्केटिंगविरोधात दाखल २९ गुन्ह्यांचा तपास राज्य गुन्हे अन्वेषण विभागाकडे सोपविण्यात आला असल्याची लेखी माहिती मुख्यमंत्र्यांनी उत्तरात दिली. पर्ल्स म्हणजेच आताच्या पीएसीएल कंपनीने गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याप्रकरणी पुणे, कोल्हापूर, सातारा, बीड, गोंदियात गुन्हे दाखल आहेत. साताऱ्यातील फसवणूक प्रकरणी सीबीआयने ताब्यात घेतलेल्या ४ आरोपींचा ताबा मिळवण्यासाठी दिल्लीच्या मुख्य महानगर दंडाधिकाऱ्यांकडे अहवाल सादर करण्यात आल्याचे मुख्यमंत्र्यांनी उत्तरात सांगितले.
आर्थिक फसवणूक रोखण्यासाठी जनजागृती
By admin | Published: March 26, 2016 1:44 AM