मुंबई : महिलांना मोफत, स्वच्छ, सुरक्षित, सार्वजनिक मुताऱ्या मिळाव्यात म्हणून गेल्या पाच वर्षांपासून ‘राइट टू पी’ (आरटीपी) ही चळवळ उभी राहिली आहे. महिलांच्या मुताऱ्यांचा प्रश्न मर्यादित न राहता तरुणांपर्यंत पोहचवण्यासाठी आता आरटीपी विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती करत आहे. रविवारी घाटकोपर येथील एका खासगी क्लासमधील मुलांबरोबर आरटीपीच्या कार्यकर्त्यांनी चर्चा केली. महिलांना मुताऱ्यांचा लढा अजूनही सुरूच आहे. पण, अनेक खासगी ठिकाणी ही स्वच्छतागृहांची सोय नसते. महिलांप्रमाणेच पुरुषांसाठीही सोय नसते. काही ठिकाणी फक्त ठरावीक व्यक्तींसाठीच स्वच्छतागृहांची सोय असते. पण, सामान्यांना स्वच्छतागृह वापरता येत नाही. खासगी क्लासेसमध्येही अनेक ठिकाणी ही परिस्थिती दिसून येते. क्लासमध्ये एसी असतो, बसण्याची उत्तम सोय असते; मात्र स्वच्छतागृहांकडे लक्ष दिले जात नाही. सार्वजनिक प्रमाणेच खासगी ठिकाणी स्वच्छतागृह सुस्थितीत असावे याविषयीची जनजागृती करण्यात येत आहे. आरटीपी कार्यकर्ते मारुती केसकर यांनी ३५ ते ४० विद्यार्थ्यांशी संवाद साधला. राज्यात अनेक ठिकाणी खासगी क्लासेस आहेत. त्यांच्यापर्यंत पोहचल्यास विद्यार्थ्यांच्या मदतीने मोठ्या प्रमाणात जनजागृती करणे शक्य होईल असे आरटीपी कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. (प्रतिनिधी)
विद्यार्थ्यांमध्ये ‘राइट टू पी’ची जनजागृती
By admin | Published: September 19, 2016 1:55 AM