आनंद डेकाटे -नागपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे साहित्य संपूर्ण जगात मार्गदर्शक असून, या साहित्याला महाराष्ट्रासह देशात व परदेशातही मोठी मागणी आहे. हे विचारधन सर्वसामान्यांपर्यंत पोहोचावे, या हेतूने महाराष्ट्र शासनाने १५ मार्च १९७५ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर चरित्र साधने प्रकाशन समिती स्थापन केली. समितीची गेल्या ४४ वर्षांत केवळ २२ खंड व ३ सोअर्स मेटरियल एवढीच कामगिरी राहिली. २००६ पासून म्हणजेच गेल्या १५ वर्षांपासून तर एकही नवीन खंड प्रकाशित झालेला नाही.
बाबासाहेबांच्या साहित्याला (खंडांना) प्रचंड मागणी असतानाही राज्य शासन व प्रकाशन समिती या खंडाच्या पुनर्मुद्रण आणि प्रकाशित मराठी खंडाचा इंग्रजी अनुवाद व इंग्रजी खंडाचा मराठी अनुवाद करण्यात सपशेल अपयशी ठरली आहे. प्रकाशित अनेक खंडांचे पुनर्मुद्रण कार्य, गेल्या १६ वर्षांपासून खंडाच्या मराठी अनुवादाची मुद्रित प्रकाशन समितीकडे मान्यतेसाठी प्रलंबित आहेत. इतकेच नव्हे, तर आजवर प्रकाशित झालेल्या एकाही इंग्रजी खंडाचा मराठी अनुवाद प्रकाशित झालेला नाही. नागपूरचे डॉ. प्रदीप आगलावे यांच्याकडे सदस्य सचिवाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
धम्मचक्र प्रवर्तनदिनी नवीन खंड यावाबाबासाहेबांच्या ‘प्रॉब्लेम ऑफ रुपी’ या अतिशय महत्त्वाच्या इंग्रजी खंडाचे मराठी अनुवादित ग्रंथ ऑगस्टमध्ये प्रकाशित करावे, अशी मागणी लावून धरण्यात आली होती. प्रकाशन समिती व सरकारकडून सकारात्मक प्रतिसादही मिळाला. परंतु, प्रकाशन झाले नाही. धम्मचक्र प्रवर्तन दिनी हा ग्रंथ हाती यावा.- प्रकाश बंसोड, अध्यक्ष, भारतीय दलित पँथर