मुंबई : मराठी विश्वकोशाच्या विसाव्या खंडाचे मुख्यमंत्री देवेंद्र्र फडणवीस यांच्या हस्ते वर्षा निवासस्थानावर प्रकाशन करण्यात आले. विश्वकोशाच्या या परिपूर्ती खंडाच्या प्रकाशनावेळी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, मराठी भाषा विभागाचे मुख्य सचिव भूषण गगराणी, प्रमुख संपादक विजया वाड यांच्यासह विश्वकोश मंडळाचे सदस्य आणि संपादकीय विभागाचे प्रतिनिधी उपस्थिती होते. विश्वकोशाच्या २०व्या खंडाची परिपूर्ती विद्यमान विश्वकोश मंडळाकडून डॉ. विजया वाड यांच्या कारकिर्दीत झाली आणि भाषेचा महान प्रकल्प पूर्ण झाल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी समाधान व्यक्त केले. विश्वकोश अद्ययावत करण्याचे काम लवकरच सुरू होईल. या कामासाठी निधीची अडचण भासू देणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली. विद्यमान खंडात ६३६ नोंदी असून त्यात १८ चित्रपत्रे आहेत. हा खंड दोन महिन्यांत उपलब्ध होणार असल्याचे विजया वाड यांनी सांगितले.या परिपूर्ती खंडाचे प्रकाशन पंतप्रधानांच्या हस्ते करण्याची मंडळाची मागणी पूर्ण होऊ शकली नाही. या सोहळ््यास सांस्कृतिक व मराठी भाषा विभागाचे मंत्री विनोद तावडेसुध्दा अनुपस्थित होते. राज्यभरातून आलेल्या विश्वकोष मंडळाच्या प्रतिनिधींनाही वर्षा बंगल्यावर प्रवेश मिळविण्यासाठी तासभर ताटकळत थांबावे लागले. (प्रतिनिधी)
विश्वकोश परिपूर्ती खंडाचे प्रकाशन
By admin | Published: June 25, 2015 1:44 AM