अतुल कुलकर्णी मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या पुस्तक प्रकाशनाला येण्याचे कबूल करूनही आयत्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे कार्यक्रमाला गैरहजर राहिल्यावरून राजकीय चर्चा रंगली आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केलेली टीका आणि सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केलेली निदर्शने यामुळे राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये अस्वस्थता पसरली.विशेष म्हणजे त्याच कार्यक्र मात शरद पवार यांनी महाराष्ट्र राजकीय दृष्टीने सुसंस्कृत आहे, राजकीय अभिनिवेश बाजूला ठेवून एकमेकांच्या सुखदु:खात सहभागी होण्याची परंपरा फक्त याच राज्यात आहे, असे सांगितले. राष्ट्रवादीचे एक नेते म्हणाले, मुख्यमंत्र्यांना जर कार्यक्रमाला यायचेच नव्हते तर आधीच नकार दिला असता तरीही चालले असते. मात्र त्यांनी कार्यक्रम स्वीकारलेला असताना ऐनवेळी येण्याचे रद्द केले. आधी मुख्यमंत्री नांदेडहून निघाल्याची बातमी आली पण त्यांचे विमान औरंगाबादला उतरले तेव्हा मुख्यमंत्री येणार नाहीत हे स्पष्ट झाले. तर महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी तर तटकरे संकटात असूनही हिमतीने उभे आहेत, असे आपल्या भाषणात सांगितले. पण हे सांगण्याचे ते व्यासपीठ नव्हते, असेही तो नेता म्हणाला. राजकीय लढाया लढण्याची व्यासपीठे वेगळी असतात, याचे भान भाजपाने दाखवले नाही, शरद पवार यांनी ज्या भावना भाषणात मांडल्या त्याउलट कालचे राजकीय चित्र होते, असेही तो नेता म्हणाला.उद्धव ठाकरे यांनी कार्यक्रमाला जातच आहात तर तटकरेंना क्लीन चिटही देऊन टाका, असा सल्ला दिला होता. त्यामुळे शिवसेनेचे कोणीही मंत्री या कार्यक्रमाकडे फिरकले नाहीत. खा. संजय राऊत आले होते. त्यांना स्टेजवर बसण्याची विनंती आयोजकांनी केली. पण राऊत यांनी त्यास नकार देत खाली श्रोत्यांमध्ये बसणे पसंत केले होते.भाजपाने मात्र आम्ही आमचे तीन-चार प्रमुख मंत्री पाठवले होते. त्यामुळे याचे राजकीय भांडवल करू नये असे म्हटले आहे. अंजली दमानिया यांनी काय करावे हा त्यांचा प्रश्न आहे पण त्यांच्या कथित आंदोलनाला मुख्यमंत्री न येण्याने दमानिया मोठ्या झाल्या अशी खोचक टिपणीही राष्ट्रवादीच्या नेत्याने केली.
तटकरेंच्या पुस्तकाचे प्रकाशन : फडणवीसांच्या अनुपस्थितीची चर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2017 4:07 AM