ऑनलाइन लोकमत
ठाणे, दि. 10 - ठाणे शहरातील मोठ्या हॉस्पिटलमध्ये एका 45 वर्षीय रुग्णाच्या पायावर शस्त्रक्रिया सुरू होती. मात्र ऑपरेशन थिएटरमध्ये झुरळ फिरताना दिसताच डॉक्टरांनी सुरू असलेली प्रक्रिया थांबवण्याचे आदेश देऊन झुरळाचं शुटिंग करायला सुरुवात केली. ठाण्यातील छत्रपती शिवाजी महाराज हॉस्पिटलमधील ही घटना आहे.
शस्त्रक्रिया करणा-या डॉक्टरनं असे वागण्यामागील कारणही तितकंच वैध आहे. रुग्णांच्या आरोग्यासंबंधीत कोणताही हलगर्जीपणा होऊ नये, यासाठी ऑपरेशन थिएटरमध्ये सर्वोच्च पातळीवरील स्वच्छता असणे गरजेचं असते. मात्र या हॉस्पिटलमधील अस्वच्छता वारंवार हॉस्पिटल प्रशासनाच्या नजरेस आणून दिल्यानंतरही 'पालथ्या घड्यावर पाणी' असाच काहीसाच प्रकार घडत होता.
अखेर वरिष्ठ ऑर्थोपेडिक सर्जन डॉक्टर संजय बरानवाल यांनी हॉस्पिटलमधील अस्वच्छता, भयानक परिस्थितीचा पुरावा मांडण्यासाठी ऑपरेशन थिएटरमध्ये वावरणा-या झुरळाचे शुटिंग केले. 'मुंबई मिरर' या वृत्तपत्राने शासकीय हॉस्पिटलमधील अस्वच्छतेच्या भयाण परिस्थितीची माहिती देणारी बातमी दिली आहे.
डॉक्टर संजय बरानवाल 6 जानेवारी रोजी रुग्णावर शस्त्रक्रिया करत असताना त्यांना पुन्हा एकदा हॉस्पिटलमधील अस्वच्छतेचा सामना करावा लागला. या परिस्थितीला कंटाळलेल्या अखेर त्यांनी पुरावाच सादर करायचे ठरवून चक्क शस्त्रक्रिया थांबवून झुरळाचे शुटिंग केले. यापूर्वीही डॉ. बरानवाला यांनी हॉस्पिटलमधील अस्वच्छतेबाबत अनेक तक्रारी केल्या होत्या. यानंतर मागील महिन्यात ठाणे महापालिकेकडून तात्पुरती निर्जंतुकीकरणाची प्रक्रिया करण्यात आली.
केवळ बरानवाला यांनीच नाही तर हॉस्पिटलमधील वरिष्ठ डॉक्टरांसह अन्य कर्मचा-यांनीही किटक, जंतुंमुळे गंभीर समस्या उद्भवल्याचे सांगितले आहे. काही रुग्णांना तर यामुळे संसर्ग झाल्याची माहितीही त्यांच्याकडून मिळली. हॉस्पिटलमधील स्वच्छता मार्गदर्शक तत्त्वानुसार, ऑपरेशन थिएटर प्रत्येक आठवड्यात धुवून स्वच्छ करणं बंधनकारक आहे, पण तसे प्रत्यक्षात घडताना क्वचितच आढळते.
डॉक्टर बरानवाल यांनी झुरळाचा व्हिडीओ पाठवल्यानंतरही ऑपरेशन थिएटर स्वच्छ करण्यात आले नव्हते, अशी माहिती तेथील डॉक्टर आणि अन्य कर्मचा-यांनी दिली. दरम्यान, हॉस्पिटलच्या डीन सी. मेहता यांनी या प्रकरणावर प्रतिक्रिया देणं टाळले.