पुणे : मागील आठवड्यापर्यंत आवाक्यात येऊ लागलेल्या डाळी पुन्हा कडाडल्या आहेत. घाऊक बाजारात तूरडाळीसह हरभरा डाळीनेही शंभरीचा टप्पा ओलांडला आहे. आठवडाभरात दोन्ही डाळींचे भाव क्विंटलमागे दीड ते दोन हजार रुपयांनी वाढले आहेत.गुलटेकडी येथील मार्केटयार्डातील घाऊक बाजारात मागील वर्षभर शंभरीच्या पुढे गेलेल्या तूरडाळीने १० दिवसांपूर्वी दीड वर्षातील भावाचा नीचांक गाठला होता. हे भाव क्विंटलमागे ७५०० ते ८५०० रुपयांपर्यंत खाली आले होते. मार्च २०१५मध्ये तूरडाळीचे भाव क्विंटलमागे सुमारे ८५०० ते ८००० रुपये एवढे होते. त्यामुळे पुढील काही दिवसांत हे भाव आणखी घसरण्याची शक्यता व्यापाऱ्यांनी व्यक्त केली होती. मात्र, प्रत्यक्षात तूरडाळीसह हरभरा, मूगडाळ व मटकीडाळीचे भाव पुन्हा वाढू लागले आहेत. मागील काही महिन्यांत बाजारात डाळींची आवक मोठ्या प्रमाणावर होत होती. केंद्र व राज्य शासनाच्या विविध प्रयत्नांमुळे भावही आटोक्यात येऊ लागले होते. त्यामुळे बाजारात मुबलक प्रमाणात डाळी उपलब्ध झाल्या होत्या. त्यामुळे शासनाच्या ९५ रुपये प्रति किलो भावाच्या तूरडाळीकडेही ग्राहकांनी पाठ फिरवली होती. (प्रतिनिधी)सद्य:स्थितीत डाळींचा साठा कमी होऊ लागल्याने साठेबाजांनी पुन्हा साठेबाजी करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे जागेवरच डाळींचे भाव वाढले आहेत. आठवडाभरात अपेक्षेपेक्षा अधिक भाववाढ झाली आहे. ३० आॅगस्टपर्यंत भाव कमी होत चालले होते. त्यानंतर मात्र, भावाने अचानक उसळी घेतली. काही दिवस ही भाववाढ कायम राहण्याची शक्यता व्यापारी विजय राठोड यांनी व्यक्त केली.
डाळी पुन्हा कडाडल्या!
By admin | Published: September 04, 2016 12:40 AM