औरंगाबाद: पुलवामा हल्ला घडला की घडवण्यात आला, असा प्रश्न लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान मनसे प्रमुख राज ठाकरेंनी वारंवार उपस्थित केला. मात्र या हल्ल्याला वर्ष पूर्ण होत असताना राज ठाकरेंनी 'जे शहीद झालं, त्यांचं दुर्दैव' म्हणत फारसं भाष्य करणं टाळलं. हल्ल्यात जायचे ते लोक गेले. नवं सरकार स्थापन झालं, असं राज ठाकरे औरंगाबादमध्ये पत्रकारांशी अनौपचारिक गप्पा मारताना म्हणाले. पुलवामा हल्ल्याला आज वर्ष पूर्ण होत आहे. त्यावेळी तुम्ही या हल्ल्यावरुन अनेक प्रश्न उपस्थित केले होते. त्या हल्ल्याबद्दल आज काय वाटतं?, असा प्रश्न राज यांना पत्रकारांनी विचारला. त्यावर काय बोलणार त्याच्यावर आता? जे शहीद झाले त्यांचं दुर्दैव. तो हल्ला घडवून आणला आहे, अशी त्यावेळची चर्चा होती. तसे काही पुरावे समोर आले होते. जवानांना त्या मार्गानं घेऊन जाऊ नका, अशा सूचना असतानाही तरीही त्याच रस्त्यानं नेण्यात आलं होतं. त्याबद्दल मी प्रश्न विचारले होते,' असं राज ठाकरे म्हणाले. 'मला वाटतं जे घडायचं होतं, ते घडलं. जायचे ते लोक गेले. नवीन सरकार बसलं. सगळ्या गोष्टी घडल्या,' अशा शब्दांत राज यांनी पुलवामातील हल्ल्यावर भाष्य केलं.
Raj Thackeray: 'लाव रे तो व्हिडीओ'मधून पुलवामा हल्ल्यावर शंका घेणारे राज ठाकरे आता म्हणतात...
By ऑनलाइन लोकमत | Published: February 14, 2020 11:44 AM