मीरा रोड : मीरा रोड येथे राहणाऱ्या राजवीर कन्होजीया (वय ४) या बालकाने पाणी समजून वाहनांच्या बॅटरीसाठी वापरले जाणारे सलफ्युरिक अॅसिड प्यायल्याची घटना घडली आहे. राजवीरवर मीरा रोड येथील सध्या वोक्हार्ट रुग्णालयात उपचार सुरू असून, त्याची प्रकृती स्थिर आहे. राजवीरच्या घरात एका बाटलीबंद पाण्याच्या बाटलीत सलफ्युरिक अॅसिड होते. तहान लागल्याने राजवीरने पाणी समजून ते प्राशन केले. त्यामुळे त्याच्या पोटात दुखू लागले. तसेच रक्ताच्या उलट्या होऊ लागल्याने त्याच्या पालकांची धावपळ उडाली. त्याला श्वसनाचा त्रास होऊ लागताच परिसरातील खाजगी रु ग्णालयात दाखल केले. परंतु, त्याची प्रकृती खालावू लागल्याने त्याला डॉक्टरांच्या सल्ल्याने मीरा रोड येथील वोक्हार्ट रु ग्णालयात हलवण्यात आले. त्यात सात तासांचा विलंब झाल्याने राजवीरच्या शरीरातील हिमोग्लोबिन वेगाने घटू लागले. त्यावेळी डॉ. ललित वर्मा यांच्या पथकाने त्वरित राजवीरच्या पोटातील लहान, मोठ्या आतड्यांची एन्डोस्कोपी करण्यास सुरु वात केली. सलफ्युरिक अॅसिडमुळे त्याच्या पोटातील अवयव निकामी होणार नाहीत, याची खबरदारी घेण्यात आली. त्याच्या पोटात रबरी नळी टाकून त्यातील, अॅसिड बाहेर काढण्यात पथकाला यश आले. अॅसिडमुळे अन्न नलिका व त्याच्या उगमस्थानापासून इजा झाल्याने अंतर्गत रक्तस्त्राव झाला होता. परंतु, उपचारास आणखी दोन तास उशीर झाला असता, तर त्याची अन्न नलिका कायमस्वरूपी जायबंदी झाली असती. अॅसिड पोटात गेलेल्या रु ग्णांना भविष्यात आतड्यांचा कर्करोगाची शक्यता असते. त्यामुळे दर तीन वर्षांनी रु ग्णाला एन्डोस्कोपी व १८ वर्षे पूर्ण झाल्यानंतर बायोप्सी करण्याचा सल्ला दिला जातो, असे डॉ. वर्मा यांनी सांगितले. सध्या राजवीरची प्रकृती स्थिर आहे. मात्र, दर १५ दिवसांनी मात्र त्याच्या पोटाची तपासणी करावी लागणार आहे. (प्रतिनिधी)
महत्त्वाचे अवयव होऊ शकतात जायबंदी-कीटनाशके, उंदरांना मारायचे विष, ब्लिचिंग पावडर, सल्फ्युरिक अॅसिड, पैराफिन (रॉकेल- तेल) अशी तत्सम द्रव्ये उपयोगात येणाऱ्या घरातील कोणत्याही भांड्यांमध्ये अथवा बाटलीत ठेऊ नये. अशा वस्तू व पदार्थ ठेवलेल्या भांड्यांवर स्प्ष्टपणे खूण करून ते बंदिस्त ठेवावेत. विषारी द्रव्ये पोटात गेल्यास मेंदू निकामी होणे, अंधत्व येणे, अर्धा भाग निकामी होणे किंवा आयुष्यभरासाठी महत्त्वाचे अवयव जायबंदी होण्याची शक्यता असते.