होऊ दे चर्चा...(पन्नास वर्षांपूर्वी पुण्यात शिकलेल्या मंडळींचं ‘गेट टुगेदर’ भरलेलं. राज्याच्या कानाकोपऱ्यातून ज्येष्ठ नागरिक एकत्र जमलेले.)पुणेरी पंत : (हात जोडत) यावे बंधुंनो यावे. आमुच्या बदलत्या पुण्यात आपुले मन:पूर्वक स्वागतम्.मराठवाडी भाऊ : पन्नास वर्षांनंतरही लेकाऽऽ तुजी नाटकी भाषा काय बदलली नाय बग. आरं, रामराम मंडळी म्हणाया काय तुज्या बाचं जाणार हाय गड्या?कोकणी तात्या : (नाकातून हेल काढत) करून गेलो गाव आन् कांदेकराचा नावऽऽ. त्येका कशाक् तरास देतोस उगाचच. खूप वर्षान् भेटलास.वऱ्हाडी भाऊ : म्या पन् त्येच म्हंतू.. काम्हुनीऽऽ तुमी भांडून राहिले? चला... पोटात कवापासून कावळे ओरडून राहिले!कोल्हापुरी नाना: (मिशाला पीळ मारत) चला भावाऽऽ म्या गावाकडनं डायरेक्ट पुण्यातच बुलेट आणली हाय. झणझणीत रश्श्याचं हॉटेल हुडका. नाय तर ‘इरून फिरून गंगावेश’... पुणेकर न्यायचे आपल्याला सप्पाऽऽक श्रीखंड-पुरी खायला. (बोलत-बोलत टीम पुण्याच्या रस्त्यावर आलेली.)सोलापुरी अण्णा : (कानडी हेल काढत) यानुबी हेळरीऽऽ पुण्याच्या पाट्या म्हणजे, लई भारी. यल्लाऽऽ छान-छान मॅटर बघाऽऽ.मुंबईकर भाई : ही पाटी बघा इलेक्शनला उभ्या असलेल्या उमेदवाराची. मी वाचत जातो. तुम्ही ऐकत राहा... ‘कृपया कार्यकर्त्यांनी रोज सकाळी आठच्या आत आमच्या प्रचाराचे साहित्य घेऊन जावे. तोडफोड झाल्यास संध्याकाळी साहित्य परत घेतले जाणार नाही.’वऱ्हाडी भाऊ : आन् या पाटीच्या बाजूला बगा.. कुणीतरी आगाव कार्यकर्ते कागुद चिटकावुशान राहिले. मुंबईकर भाई : (नीट वाचत) ‘तुमचे राष्ट्रवादी काँग्रेस नावाचे फलक माझ्याकडून चुकून थोडे फाटले. तेव्हा मी ते तुमच्या शेजारच्या काँग्रेस उमेदवाराला दिले आहे. त्याने फक्त राष्ट्रवादी शब्द पुसून फलकाचा वापर सुरू केला आहे. अजून असे फलक असतील तर सांगावे. चौकातल्या मंडळाच्या मुलांना पाठवू.’ (पुढच्या गल्लीत मतदाराच्या घरासमोरील पाटी)पुणेरी पंत : ही आमच्या नेन्यांनी लेल्यांसोबत ‘काँट्रीबिशन’ करून लावलेली पाटी. ‘कृपया उमेदवारांनी निवडणुकीच्या गिफ्ट वस्तू दारावरच्या टपाल बॉक्समध्ये ठेवून जाव्यात. विनाकारण बेल दाबून डिस्टर्ब करू नये.’(विस्फारलेले डोळे घेऊनच टीम पुढच्या बोळात.)मुंबईकर भाई : ही पाटी बहुधा मतदान केंद्रावर उपस्थित राहणाऱ्या प्रतिनिधींची असावी. दसरा-दिवाळीत फ्लेक्सवाले फुल्ल बिझी असतात. म्हणून, त्यांनी स्लॅक सिझनमध्येच डिस्काऊंट रेटमध्ये तयार करून घेतलीय. हा पाहा मॅटर... ‘मतदानादिवशी’ दुपारी दोन ते साडेतीनच्या दरम्यान मतदारांनी केंद्राबाहरेच रांगेत थांबावे. ही वेळ प्रतिनिधींच्या विश्रांतीची असते, याची नोंद घ्यावी.’टीम : (एक सुरात) पुणेरी पाट्यांच्या नावानं चांगभलं! आमचं-आमचं रेल्वे तिकीट बुक करा !! आम्हाला बासऽऽ. - सचिन जवळकोटे
‘पुणेरी पाटी’ही म्हणे, राजकारणात रंगली !
By admin | Published: September 22, 2014 9:33 AM