पुणे : सेंट्रल बोर्ड आॅफ सेकंडरी एज्युकेशनतर्फे (सीबीएसई) रविवारी आयोजित नेट परीक्षेला पुण्यात सुमारे १०० विद्यार्थी मुकले. एक-दोन मिनिटांपासून ते पाच मिनिटे उशिरा आल्याचे कारण देत, ‘सीबीएसई’च्या अधिकाऱ्यांनी त्यांना परीक्षेला बसू दिले नाही. विशेष म्हणजे, एका अंध विद्यार्थ्यालाही असंवेदशीलता दाखवित वर्गाबाहेर काढले. हाच प्रकार मुंबईतही काही विद्यार्थ्यांसोबत घडला. अवघ्या काही मिनिटांसाठी त्यांना परीक्षेला मुकावे लागले. परीक्षा प्रशासनाकडून मात्र, अधिकृतपणे काहीही सांगितलेले नाही.या प्रकारामुळे विद्यार्थ्यांनी प्रशासनाविरुद्ध संताप व्यक्त केला आहे. विद्यापीठ अनुदान आयोगाकडून ‘नेट’च्या आयोजनाची जबाबदारी ‘सीबीएसई’कडे दिली आहे. शहरातील विविध केंद्रांवर एक-दोन मिनिटे उशिरा पोहचलेल्या विद्यार्थ्यांना बाहेर काढले. पहिला पेपर सकाळी ९.३०ला होता. त्यापूर्वी किमान अर्धा तास आधी विद्यार्थ्यांनी केंद्रावर हजर राहणे बंधनकारक असते. परंतु जळगाव, लातूर, सातारा, पुणे आदी जिल्ह्यांच्या ग्रामीण भागामधील काही विद्यार्थ्यांना ५ ते १० मिनिटे उशीर झाला. त्यामुळे शिवाजीनगर येथील पॉलिटेनिक कॉलेजच्या केंद्र प्रमुखांनी त्यांना परीक्षेस बसू दिले नाही. बाणेरच्या आॅर्किड इंटरनॅशनल स्कूलच्या परीक्षा केंद्रावर जळगाव येथील जितेंद्र पाटील या अंध विद्यार्थ्याला दोन मिनिटे उशिरा आल्याने केंद्राबाहेर काढले.पॉलिटेक्निक कॉलेजच्या केंद्रावर मी वेळेत पोहोचलो होतो. हॉलमध्ये गेल्यावर मात्र मला परीक्षेस बसू दिले नाही. मी केंद्र प्रमुखांना भेटण्यासाठी गेलो. ते नाष्टा करीत होते. त्यात पाच ते १० मिनिटे गेली. त्यानंतर केंद्र प्रमुखांनीही उशीर झाल्याचे सांगत मला बाहेर जाण्यास सांगितले, अशी तक्रार सतीश येलकर यांनी ‘लोकमत’कडे केली. अंध विद्यार्थीही वर्गाबाहेरमला आॅर्किड इंटरनॅशनल स्कूल केंद्राच्या प्रवेशद्वारावर थांबवले व दुसऱ्या प्रवेशद्वारातून जाण्यास सांगितले. त्यामुळे मला दोन मिनिटे उशीर झाला. त्यानंतर मला परीक्षेस बसू दिले नाही, अशी माहिती जळगावचे अंध विद्यार्थी जितेंद्र पाटील यांनी दिली.केंद्र बदलाचाही फटकानेट परीक्षेचे केंद्र बदलल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये गोंधळाचे वातावरण असल्याचे वृत्त ‘लोकमत’ने २० जानेवारीला दिले होते. रविवारी अनेक विद्यार्थ्यांना केंद्र बदलाचा फटका बसला. लुल्लानगर, दिघी, पिंपरी चिंचवड भागात केंद्र बदल झाल्याने विद्यार्थ्यांना उशीर झाला. (प्रतिनिधी)
पुण्यात १०० विद्यार्थी नेट परीक्षेला मुकले
By admin | Published: January 23, 2017 4:24 AM