पुण्यातील कल्याणीनगर येथे झालेल्या अपघात प्रकरणावरून महाविकास आघाडीच्या नेत्यांना सरकारविरोधात आक्रमक भूमिका घेतलेली आहे. या घटनेवरून गृहमंत्रालयाच्या कारभाराचे वाभाडे काढत असलेल्या शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी उपमुख्यमंत्री आणि राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पुन्हा एकदा टोला लगावला आहे. सगळंच जर मी करायचं असेल, तर मी पुन्हा म्हणेन की गृहखातं माझ्याकडे द्या, मी चालवून दाखवते, असं विधान सुषमा अंधारे यांनी केलं. आज पुण्यामध्ये प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना सुषमा अंधारे म्हणाल्या की, सीडीआर वगैरे तपासणं ही गृहखात्याची जबाबदारी आहे. बाकी सगळंच जर मी करायचं असेल, तर मी पुन्हा म्हणेन की गृहखातं माझ्याकडे द्या, मी चालवून दाखवते, असं आव्हान सुषमा अंधारे यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिलं.
सुषमा अंधारे पुढे म्हणाल्या की, संजय राठोड कॅबिनेटमंत्री असताना जेव्हा आरोप झाले, तेव्हा संजय राठोड यांचा राजीनामा घेतला गेला. तसेच अनिल देशमुख यांच्याविरुद्ध भ्रष्टाचाराची केवळ ऐकीव माहिती आणि परमबीर सिंह यांनी केलेले आरोप, जे आरोप सिद्धही झालेले नव्हते, तरीही त्यांना कोठडीत टाकलं गेलं. पण आम्ही आता आहेराची यादीच वाचली, पण आता काय कारवाई झाली? आम्ही आरोप करून ४८ तास झाले. या ४८ तासांमध्ये शंभुराज देसाई यांचं कुठलं अधिकृत वक्तव्य आलंय. का ते या आरोपांवर अधिकृत वक्तव्य करत नाहीत. भाजपाला भ्रष्टाचार आणि वसुलीची चिड आहे ना, मग यावर गृहमंत्र्यांचं अधिकृत वक्तव्य का येत नाही, असा सवाल सुषमा अंधारे यांनी उपस्थित केला.
अपघात तसे अनेक होतात. मात्र या एका अपघातामुळे सरकारच्या वेगवेगळ्या विभागांचा भोंगळ कारभार आणि भ्रष्टाचाराने पोखरून काढलेली सगळी व्यवस्था चव्हाट्यावर आलेली आहे. हे देवेंद्र फडणवीस यांनाही मान्य करावं लागेल, असा टोलाही सुषमा अंधारे यांनी लगावला.