पुणे : अनोळखी क्रमांकावरून ‘एसआरपीएफ’च्या जवानाला मुंबईत बॉम्ब ठेवल्याचा दूरध्वनी आला. नियंत्रण कक्षाला माहिती कळविण्यात आली. मुंबई पोलीस, एटीएसने फोन क्रमांकावरून ठिकाण शोधले असता, तो कोलकाता येथील असल्याचे समजले. कोलकाता पोलिसांना याची खबर दिल्यानंतर संबंंधिताचा काही तासांत शोध घेण्यात आला. त्यानंतर कुठेही बॉम्ब ठेवला नसल्याचे स्पष्ट झाले. मात्र, पुण्यासह मुंबई, कोलकात्यातील पोलिसांना पळापळ करावी लागली. मागील काही दिवसांत तिसऱ्यांदा बॉम्ब ठेवल्याचा फोन पोलिसांना आला आहे. या तिन्ही घटनांमध्ये ती अफवा असल्याचे समोर आले. सध्या इसिसचा धोका असल्याने पोलीस कोणत्याही घटनेकडे दुर्लक्ष करीत नाहीत. बुधवारी आलेल्या फोनमुळे पुण्यासह मुंबई व कोलकात्यातील पोलीस यंत्रणाही कामाला लागली. या प्रकरणात कोलकाता येथील मोहंमद झाकीर (वय ३६, रा. मोंगामियान, डमडम, कोलकाता) याच्याविरोधात वानवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. सुधीर भीमराव उगले (वय २५, रा. एसआरपीएफ, वानवडी) यांनी फिर्याद दिली आहे. झाकीर याला पुण्यात आणण्यासाठी पुणे पोलिसांचे पथक कोलकात्याला गेले आहे. त्याची चौकशी केल्यानंतरच त्याने फोन खोडसळपणे केला होता की, त्याचे कोणत्या संघटनेशी संबंध आहेत हे स्पष्ट होईल, अशी माहिती पोलीस निरीक्षक (गुन्हे) एम. आर. पंडित यांनी दिली. (प्रतिनिधी)
पुणे आणि मुंबई पोलिसांची बॉम्बच्या धमकीने पळापळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 29, 2016 2:08 AM