पुणे : पहाटे झोपेत असतानाचा एका सामाजिक कार्यकर्त्याला गावाकडून चुलते वारल्याचा फोन येतो. ते धावतपळत स्वारगेट एसटी स्थानक गाठतात. बसमध्ये चढत असताना वाहक उद्धटपणे वागतो. त्याचे कारण विचारताच वाहक आणि चालक त्याला बेदम मारहाण सुरू करतात. रक्तबंबाळ अवस्थेतील या कार्यकर्त्याला सहप्रवासी सोडवतात. मुजोर एसटी कर्मचाऱ्यांना पकडून पोलिसांच्या ताब्यात देतात. उपचार करून गुन्हा दाखल करेपर्यंत संध्याकाळचे ७ वाजतात आणि शेवटी चुलत्यांच्या अंत्ययात्रेला त्याला जाताच येत नाही. चंद्रकांत पर्बती घोरपडे (४२, रा. मत्त्यापुर, सातारा) हे चिखली प्राधिकरणामध्ये राहतात. घोरपडेंना रविवारी पहाटे गावाकडून चुलते वारल्याचा फोन आला होता. अंत्ययांत्रेला जाण्यासाठी ते सकाळी आठच्या सुमारास स्वारगेट एसटी स्थानकात पोहोचले. साताऱ्याला जाणाऱ्या फलाटावर बस उभी होती. बसच्या दरवाजातच वाहक अमोल अशोक दुबे (२९, रा. रत्नागिरी) उभा होता. घोरपडेंनी त्याला ही बस अतित स्थानकावर थांबते काय, असे विचारल्याचा त्याला राग आला. शिवीगाळ करीत त्याने उद्धट उत्तरे द्यायल्या सुरुवात केली. त्याचा जाब विचारल्यावर घोरपडेंना त्याने मारायला सुरुवात केली. त्याच्या मदतीला बसचा चालकही आला. दुबे याने तिकिटाच्या मशीनने डोक्यात वार केल्यामुळे घोरपडेंच्या डोक्याला मोठी जखम झाली. त्यांच्या डोक्याला चार टाके पडले आहेत. त्यानंतर त्यांनी स्वारगेट पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. आरोपीला अटक करेपर्यंत संध्याकाळचे सात वाजले. एसटी प्रशाननाने घोरपडेंवरच तक्रार मागे घेण्यासाठी दबाव आणायला सुरुवात केली. या सर्व गदारोळात त्यांना चुलत्याच्या अंत्यसंस्काराला जाता आले नाही. (प्रतिनिधी)
पुण्यात एसटीवाहकाची प्रवाशाला बेदम मारहाण
By admin | Published: September 15, 2014 4:00 AM