पुणे- शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या वरसगाव व पानशेत या धरणांनी तळ गाठला आहे. जून संपत आला, तरी या धरणांचे पात्र अजूनही कोरडेठाक पडले असल्याचे गंभीर चित्र मंगळवारी दिसून आले. शहराच्या पाणीकपातीमध्ये वाढ करण्याशिवाय पर्याय नसल्याचे या पाहणीमध्ये स्पष्ट झाले. महापौर प्रशांत जगताप यांनी पाटबंधारे विभाग व महापालिकेच्या अधिकाऱ्यांसह धरणातील पाणीसाठ्याची पाहणी केली. या वेळी पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता पी. बी. शेलार, पाणीपुरवठा विभागाचे प्रमुख व्ही. जी. कुलकर्णी, अधीक्षक मदन आढारी आदी उपस्थित होते.या वेळी धरणसाठ्यात एकूण १.५४ टीएमसी पाणी शिल्लक राहिले असल्याची माहिती पाटबंधारे विभागाकडून देण्यात आली. हे पाणी २५ जुलैपर्यंत पुण्याला पुरू शकेल, अशी माहिती पाटबंधारे विभागाकडून महापौरांना देण्यात आली.धरणांमध्ये साधारणत: ५ टक्के इतके पाणी शिल्लक आहे. मात्र, त्यातील १. ६० टीएमसी पाणी हे डेडस्टॉक असते. शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी ते उचलता येत नाही. उर्वरित १.५४ टीएमसी पाणी वापरता येईल. पावसाळा सुरू झाल्यानंतर पानशेत व वरसगाव या धरणांच्या परिसरात मोठ्या प्रमाणात पाऊस होतो. मात्र, यंदा तेथे पावसाचे प्रमाण अत्यल्प आहे.हवामान विभागाने दिलेले पावसाचे अंदाज चुकीचे ठरले आहेत. त्यामुळे शहराच्या पाण्याचे नियोजन करण्याचा प्रश्न उभा राहिला आहे. पानशेत धरणातील पाणी खूपच खाली गेले आहे. धरणाच्या दरवाजापर्यंत जाऊन महापौरांनी पाण्याची प्रत्यक्ष पाहणी केली. धरणांमधील पाण्याची स्थिती खूपच चिंताजनक असल्याची भावना त्यांनी या वेळी व्यक्त केली. शहराला पाऊस पडेल, पाणी येईल या शक्यतेवर सोडता येणार नसल्याचे स्पष्ट केले.
पुण्याला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांनी गाठला तळ
By admin | Published: June 29, 2016 12:48 AM