पुणे - शहरातील बावधननजीक बुधवारी सकाळी हेलिकॉप्टर कोसळलं. या दुर्घटनेत ३ जणांचा मृत्यू झाला. आता याबाबत आणखी एक धक्कादायक माहिती समोर येत आहे. दुर्घटनाग्रस्त हेलिकॉप्टर पु्ण्याहून मुंबईच्या दिशेने जात होते. सकाळी हेलिकॉप्टर सुनील तटकरेंना पिकअप करून पुण्याच्या दिशेने येणार होते, मात्र त्याआधीच पुण्यात हेलिकॉप्टरचा अपघात झाला.
अजित पवारांच्या राष्ट्रवादी पक्षाचे खासदार आणि प्रदेशाध्यक्ष असलेले सुनील तटकरे यांना पुण्यात आणण्यासाठी हेलिकॉप्टर निघाले होते. मात्र बुधवारी सकाळी ऑक्सफर्ड गोल्फ क्लब हेलिपॅडवरून उड्डाण घेतल्यानंतर काही वेळातच हेलिकॉप्टरला अपघात झाला. हेरिटेज एव्हिएशनच्या मालकीचे हे हेलिकॉप्टर मुंबईतील जुहूच्या दिशेने जात होते. सुनील तटकरे यांनी मंगळवारी या ट्विन इंजिनच्या ऑगस्टा हेलिकॉप्टरमधून प्रवास केला होता. सुनील तटकरे हे मंगळवारी हेलिकॉप्टरने पुण्याहून परळीला गेले होते. त्यानंतर सुनील तटकरे या हेलिकॉप्टरमधून मुंबईत आले, अमित शाहांच्या बैठकीनंतर ते पुण्याला जाणार होते, नंतर त्याच हेलिकॉप्टरने ते पुन्हा रायगडमधील सुतारवाडीला जाणार होते.
पुण्यातील बावधन बुद्रुक गावाजवळ सकाळी ६.४५ वाजता झालेल्या अपघातात हेलिकॉप्टरमधील तीन जण- दोन पायलट आणि एक अभियंता यांचा मृत्यू झाला. कॅप्टन पिल्लई आणि कॅप्टन परमजीत सिंग अशी मृत वैमानिकांची नावे आहेत. प्रीतम भारद्वाज असे मृत अभियंत्याचे नाव आहे. पोलीस पथकासह अग्निशमन विभागाच्या गाड्या घटनास्थळी पोहोचल्या आहेत अशी माहिती पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांनी दिली.
पोलिसांनी सांगितले की, हेलिकॉप्टरच्या इंजिनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने लगेचच आग लागली, परिणामी संपूर् हेलिकॉप्टरचा स्फोट झाला असावा, अपघाताचे खरे कारण अद्याप समजू शकले नसून तपास सुरू करण्यात आला आहे. घटनास्थळी दोन रुग्णवाहिका आणि चार अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल झाल्या आहेत. खराब हवामान आणि कमी दृश्यमानतेमुळे हेलिकॉप्टर डोंगराळ भागातून जात असताना क्रॅश झाले असावे असं अंदाज आहे. दुर्घटनेतील मृतदेह पुण्यातील ससून जनरल हॉस्पिटलमध्ये नेले जाण्याची शक्यता आहे.