राहुल गांधींनी कोर्टात हजर राहावे; वीर सावरकर बदनामी प्रकरणी पुणे कोर्टाचे आदेश
By ऑनलाइन लोकमत | Published: November 19, 2024 08:22 AM2024-11-19T08:22:51+5:302024-11-19T08:24:42+5:30
२ डिसेंबरला न्यायालयात हजर होणे अनिवार्य असेल अन्यथा त्यांना अटक करून न्यायालयासमोर हजर केले जाऊ शकते अशी माहिती सात्यकी सावरकर यांचे वकील संग्राम कोल्हटकर यांनी दिली आहे.
पुणे - स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या बदनामी प्रकरणी काँग्रेसचे नेते आणि लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना सोमवारी पुणे कोर्टाने समन्स बजावले आहे. १८ नोव्हेंबरला कोर्टात यावर सुनावणी झाली, या सुनावणीस राहुल गांधी त्यांच्या व्यस्त कार्यक्रमामुळे हजर राहू शकले नाहीत. त्यामुळे येत्या २ डिसेंबरला पुण्याच्या विशेष न्यायालयात हजर राहण्याचे आदेश न्यायदंडाधिकारी अमोल शिंदे यांनी दिले आहेत.
लंडन येथील एका कार्यक्रमात सावरकर यांच्याविषयी राहुल गांधी यांनी कथित आक्षेपार्ह विधान केले होते. त्यामुळे सावरकर यांचे नातू सात्यकी सावरकर यांनी गांधी यांच्याविरोधात बदनामीचा खटला दाखल केला आहे. यामध्ये राहुल गांधींना न्यायालयात हजर होण्याबाबत यापूर्वी पाठवलेले समन्स तीस हजारी जिल्हा न्यायालयाऐवजी पतियाळा हाऊस न्यायालयात गेल्याने पुन्हा पुण्याच्या विशेष न्यायालयात परत आले होते. त्यामुळे गांधींना विशेष न्यायालयाकडून समन्स बजावलेले होते. राहुल गांधी यांच्या घरी ते समन्स पोहचवण्यात आले. राहुल गांधी यांना समन्स मिळाल्याचे कागदपत्रे फिर्यादी यांचे वकील संग्राम कोल्हटकर यांनी न्यायालयात सुपूर्द केले.
फिर्यादी यांचे वकील संग्राम कोल्हटकर यांनी राहुल गांधी यांना कोर्टाचं समन्स मिळूनही ते कोर्टासमोर हजर झाले नाहीत त्यामुळे राहुल गांधी यांना अजामीनपात्र वॉरंट काढावे अशी मागणी त्यांनी केली. राहुल गांधी यांच्या वतीने मिलिंद पवार हे कोर्टासमोर बाजू मांडत आहेत. तर राहुल गांधी यांना कोणत्याही प्रकारची सहानुभूती दाखवण्यात येऊ नये. २ डिसेंबरला न्यायालयात हजर होणे अनिवार्य असेल अन्यथा त्यांना अटक करून न्यायालयासमोर हजर केले जाऊ शकते अशी माहिती सात्यकी सावरकर यांचे वकील संग्राम कोल्हटकर यांनी दिली आहे.
काय म्हणाले होते राहुल गांधी?
सात्यकी सावरकर यांनी कोर्टात दाखल केलेल्या याचिकेत दावा केलाय की, राहुल गांधी हे मार्च २०२३ साली लंडनमधील एका कार्यक्रमाला संबोधित करत होते. तेव्हा ते म्हणाले, सावरकर यांच्या पुस्तकात असा उल्लेख आहे की, त्यांनी आणि त्यांच्या ५-६ मित्रांनी मिळून एका मुस्लीम व्यक्तीला मारहाण केली होती तेव्हा सावरकर खुश झाले होते. याचिकाकर्त्यांनुसार सावरकर यांनी कधीही अशाप्रकारे काही लिहिल्याचा उल्लेख नाही असं सांगत सात्यकी सावरकर यांनी राहुल गांधींविरोधात मानहानीचा खटला दाखल केला.