ऑनलाइन लोकमत -
पुणे, दि. 09 - उत्तमनगर परिसरातील दुचाकी जळीकांड प्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. रमेश शिंदे असं या आरोपीचं नाव असून घरगुती वादातून त्याने या दुचाकी जाळल्याची माहिती मिळत आहे. वहिनीसोबत झालेल्या वादावरुन रमेश शिंदेने रागातून या दुचाकी जाळल्या आहेत. महत्वाचं म्हणजे रमेश शिंदेची वहिनी राधिका शिंदे यांनीदेखील पोलीस ठाण्यात दुचाकी जळीतकांड प्रकरणी तक्रार केली होती.
रविवारी पहाटे उत्तमनगरमधील मोरया पेट्रोलपंपामागील भागातील सोसायटीच्या पार्किंगमधील सात दुचाकी जाळण्यात आल्या होत्या. पुण्यात याअगोदरही जळीतकांडाच्या अनेक घटना घडल्या असल्याने पोलिसांनी तात्काळ तपासाला सुरुवात केली. पोलिसांनी 12 तासांत प्रकरणाचा छडा लावत आरोपी रमेश शिंदेला अटक केली. याअगोदर झालेल्या जळीतकांडाच्या घटनेशी रमेश शिंदेचा संबंध असल्याचा पोलिसांना संशय होता. मात्र त्याने घरगुती वादातूनच हे कृत्य केल्याचं पोलीस तपासात समोर आलं आहे.
पुण्यातील उत्तमनगर परिसरातील एका सोसायटीत उभ्या असलेल्या सात दुचाकी अज्ञातांनी पेटवून दिल्या होत्या. रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास ही घटना घडली. या सातही दुचाकी आगीत जळून खाक झाल्या. आगीच्या ज्वाळा नजरेस पडताच सोसायटीतील रहिवाशांनी तात्काळ अग्निशमन दलाला या आगाची माहिती दिली. अग्निशमन दलाने तात्काळ घटनास्थळी पोहोचून ही आग विझवली.