ऑनलाइन लोकमत
पुणे, दि. 04 - पुण्य पदरी असेल तरच स्वर्गाचेद्वार खुले होते, असे मानले जाते. पण ‘पुणे तिथे काय उणे’ या उक्तीचा प्रत्यक्ष अनुभव पुणेकरांनाच शुक्रवारी आला. पीएमपी प्रशासनाच्या बीआरटी बसने प्रवास करणा-या पुणेकरांसाठी हे द्वार सताड खुले केले. संगमवाडी ते विश्रांतवाडी या बीआरटी मार्गावरील एका बसस्थानकावर प्रवाशांना हा अनोखा अनुभव येत होता. बसस्थानकावरीलल डिजिटल फलकावर बसचे शेवटचे स्थानक ‘स्वर्गात’ असे झळकत होते.
संगमवाडी ते विश्रांतवाडी या बीआरटी मार्गावरील बसस्थानकांवर डिजिटल फलक बसविण्यात आले आहेत. या फलकांवर बसस्थानकाचे नाव, मार्ग क्रमांक, दरवाजा, स्थळ आणि अपेक्षित वेळ ही माहिती मराठी व इंग्रजी अशा दोन्ही भाषेत दिली जाते. आज सकाळी या मार्गावरील केंद्रीय विद्यालय बसस्थानकावरील फलकावर बसचे स्थळ ‘स्वर्गात’ असे झळकू लागले. तर त्याखाली इंग्रजी ‘स्वारगेट’ या शब्दाचे भाषांतर ‘स्वर्गात’ करण्यात आल्याचे दिसत होते. बराच वेळ असेच असल्याने प्रवाशांमध्ये चर्चेचा विषय झाला. प्रवाशांनी या फलकाचे छायाचित्र काढून सोशल मिडियावर टाकले. त्यामुळे दिवसभर हे छायाचित्र सोशल मिडियावर फिरत असल्याने मनोरंजनाचा विषय ठरले होते.
दरम्यान, बीआरटी नियंत्रण कक्षामधून डिजिटल फलकांवरील माहिती अपडेट करण्याचे काम सुरू आहे. अनेक स्थानकांची नावे चुकीच्या पध्दतीने येत आहेत. ही नावे दुरूस्त करण्याचे काम सध्या सुरू आहे, ही तांत्रिक चुक असल्याचे पीएमपी प्रशासनाकडून सांगण्यात आले.