ऑनलाइन लोकमत
पुणे, दि. 14 - अनेकांना भरपूर शिकण्याची इच्छा असते. पण घरची परिस्थिती किंवा अन्य कारणांमुळे त्यांना शिक्षण अर्ध्यावर सोडावे लागते. अशा शिक्षण अपूर्ण राहिलेल्या काहीजणांना पुढे भविष्यात नशीबाने शिकण्याची संधी मिळते. ते सुद्धा जिद्द न सोडता मिळालेल्या संधीचे सोने करुन दाखवतात. पुण्यात राहणा-या रेखा चौरेची कहाणी सुद्धा अशीच. लवकरच लग्न झाल्यामुळे रेखाला तिचे शिक्षण अर्ध्यावरच सोडावे लागले होते. पण कुटुंबाने दिलेल्या पाठिंब्यामुळे रेखाने तिचे शिक्षण पूर्ण करण्याचा निर्णय घेतला.
कालच दहावी शालांत परीक्षेचा निकाल जाहीर झाला. रेखा एसएससी बोर्डाची ही परीक्षा 72 टक्के गुणांनी उर्तीण झाली. शाळा सोडल्यानंतर तब्बल 20 वर्षांनी रेखा दहावीची परीक्षा उर्तीण झाली. दोन मुलांची आई असणारी रेखा आता 35 वर्षांची असून ती एका प्लॅस्टिक वस्तूंच्या दुकानात नोकरी करते. नोकरी करुन रोज वर्गात हजर राहणे रेखाला शक्य नव्हते. त्यासाठी तिने रात्र शाळेत प्रवेश घेतला. दिवसा नोकरी, रात्रीची शाळा, घर, संसार संभाळून रेखाने हे यश कमावले.
रात्रशाळेशिवाय हे यश शक्त नव्हते हे रेखा प्रांजळपणे कबूल करते. मूळची सोलापूरची असलेल्या रेखाला उच्चशिक्षण घेण्याची इच्छा होती पण लवकर लग्न झाल्यामुळे तीला आपल्या शिक्षणाच्या इच्छेवर पाणी सोडावे लागले. घर संसारात स्थिर झाल्यानंतर रेखाला तिच्या नव-याने आणि मुलीने शिक्षण पूर्ण करण्यासाठी पाठिंबा दिला. माझ्या मुलीमुळे मला शिकण्याची प्रेरणा मिळाली असे रेखा सांगते.
रेखा प्रमाणेच 45 वर्षीय लक्ष्मण चव्हाणही 60 टक्के गुण मिळवून एसएससीची परीक्षा उर्तीण झाले. आपल्या मुलांच्या नशिबीही कचरा उचण्याचे काम येऊ नये अशी लक्ष्मण चव्हाण यांची इच्छा आहे. त्यासाठी त्यांनी स्वत: रात्र शाळेत प्रवेश घेऊन शिकण्याचा निर्णय घेतला. चव्हाण यांचा दिवस सकाळी 6 वाजता सुरु व्हायचा. दोन ठिकाणी नोकरी केल्यानंतर अंगात त्राण नसायचा. पण त्याही परिस्थितीत त्यांनी शिक्षण चालू ठेवले व 60 टक्के गुण मिळवले.
19 वर्षाच्या महेश साळुंखेलाही घरची परिस्थिती बेताची असल्याने वेळेत 10 वी ची परीक्षा देता आली नाही. शिकण्याच्या वयात त्याला नोकरी करावी लागत होती. तरीही महेशने जिद्द सोडली नाही. त्याला 10 वी च्या परीक्षेत 58 टक्के गुण मिळाले.