ऑनलाइन लोकमत
पुणे, दि. 22 - राज्याच्या कमवा व शिका योजनेच्या ब्रॅण्ड अॅम्बॅसिडर पदी नियुक्त झालेल्या सोमनाथ गिरम यांचा अपघात झाल्याने ते सध्या संचेती रुग्णालयात उपचार घेत आहेत. गिरम यांची आर्थिक परिस्थिती हालाखीची असल्यामुळे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने त्यांना एक लाख रुपये आर्थिक मदत करण्याचा निर्णय गुरूवारी विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेत घेतला.
आर्थिक परिस्थिती हालाखीची असली तरीही जीद्द आणि कष्टाच्या जोरावर यशाच्या शिखरावर पोहचता येते. याचे उत्तम उदाहरण सोमनाथ गिरम यांनी दाखवून दिले. गिरम यांनी चहा विकून सी.ए.परीक्षेत यश संपादन केले. राज्याचे शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी त्यांच्या यशाची दखल घेवून कमवा व शिका योजनेच्या ब्रॅण्ड अॅम्बॅसिडरपदी त्यांची नियुक्ती केली.परंतु, काही दिवसांपूर्वी सोलापूर येथे झालेल्या एका अपघातात त्यांच्या मनक्याला जोरदार धक्का बसला. सध्या त्यांच्यावर पुण्यातील संचेती रुग्णालयात उपचार सुरु आहेत. गिरम हे विद्यापीठाशी संलग्न गरवारे महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी आहेत. विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.वासुदेव गाडे यांनी रुग्णालयात भेट घेतली होती.त्यावेळी गिरम यांनी आर्थिक मदतीबाबत विनंती केली होती.