पुणे - बुधवारी रात्री पुण्यामध्ये अचानक कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे शहरातील अनेक भागात पुरस्थिती निर्माण झाली होती. या पुरात आतापर्यंत 12 जणांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, शहरात गंभीर पूरपरिस्थिती निर्माण झाली असताना, पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे जागावाटपाच्या चर्चेसाठी दिल्लीत गेले आहेत. त्यावरून विरोधकांनी जोरदार टीका केली आहे. 'जागावाटपापेक्षा पुण्यातील पुरपरिस्थितीकडे लक्ष द्या,' असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी फडणवीस आणि चंद्रतांत पाटील यांना लगावला आहे. भुजबळ म्हणाले की, या सरकारला पुरपरिस्थितीचे गांभीर्य नाही. कोल्हापूर, सांगलीत पूरस्थिती असतानाही सरकारकडून दिरंगाई झाली. आज पुण्यात पुरस्थिती निर्माण झाली असताना पालकमंत्री चंद्रकांत पाटील आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्लीला गेले आहे. मात्र सद्यस्थितीत जागावाटपाला उशीर झाला तरी हरकत नाही. पण पुण्यातील पुरस्थितीकडे लक्ष द्या. पुरग्रस्तांना दिल्या जाणाऱ्या मदतकार्याला उशीर होणे योग्य नाही, असे भुजबळ यांनी सांगितले. दरम्यान, पुण्यातील पुरस्थितीबाबत सरकारने दाखवलेल्या अनास्थेवरून विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनीही राज्य सरकारवर टीका केली होती. शहर आणि परिसरात झालेल्या ढगफुटीमुळे नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. आतापर्यंत 10 जणांचा मृत्यू झाला आहे तर अनेक ठिकाणी एनडीआरएफचे जवान लोकांना वाचविण्याचे प्रयत्न करत आहेत. पुण्यात इतकी भयंकर स्थिती असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पुण्याचे पालकमंत्री दिल्लीला युतीच्या बैठकीसाठी गेलेले आहेत. सरकारला पूरस्थितीचं गांभीर्य नाही अशा शब्दात विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारवर टीका केली आहे.
जागावाटपापेक्षा पुण्यातील पुराकडे लक्ष द्या, भुजबळांचा भाजपाला टोला
By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2019 2:57 PM