पुणे : लोहमार्ग पोलिसांच्या पथकाने थेट उत्तरप्रदेशातून रेल्वेने आणण्यात येत असलेली २५ लाख रुपयांची रोकड जप्त केली. विशेष म्हणजे, या रकमेमध्ये दोन हजाराच्या नव्या नोटा आहेत. याबाबत प्राप्तिकर विभागाला माहिती कळवण्यात आली असून दोघांना ताब्यात घेतल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय सातव यांनी दिली. मनिष उमाशंकर द्विवेदी (वय ३६, रा. शिवनगर कॉलनी, भुलणपुर, जि. वाराणसी), प्रमोदकुमार मेवालाल जैसवाल (वय २४, रा. नुरी, जि. चंदोली) अशी दोघांची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मनिष आणि प्रमोदकुमार गुरुवारी दुपारी ज्ञानगंगा एक्स्प्रेसने पुणे रेल्वे स्थानकावर पोहोचले. फलाट क्रमांक दोनवर पोलिसांकडून नेहमीप्रमाणे सुरक्षेबाबत बॅग तपासणी सुरु होती. या दोघांच्या बॅगांची तपासणी केली असता त्यामध्ये दोन हजारांच्या नव्या नोटांचे बंडल दिसून आले. त्यांच्याक डे याबाबत चौकशी केली असता त्यांनी सुरुवातीला समाधानकारक उत्तरे दिली नाहीत. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणले. तेथे अधिक चौकशी केली असता ही रक्कम वाराणसी येथील गंगा पेपर्स लिमिटेड या कंपनीची असल्याची माहिती त्यांनी पोलिसांना दिली. पुण्यातील एका अधिकाऱ्याला देण्यासाठी ही रक्कम आणल्याची माहितीही या दोघांनी दिली आहे. त्यांच्याकडे रकमेची खातरजमा करणारी कोणतीही कागदपत्रे नसल्यामुळे पोलिसांनी रोकड जप्त केली आहे. (प्रतिनिधी)
पुण्यात पंचवीस लाख पकडले
By admin | Published: December 30, 2016 2:00 AM