पुणे - सोसायटीच्या पार्किंगमध्ये खेळत असलेल्या ओम संदीप खरात या सात वर्षीय मुलाचे शनिवारी अपहरण झाले आणि पोलीस दलात एकच खळबळ उडाली. साठ लाखांच्या खंडणीसाठी झालेले हे अपहरण पोलिसांसमोर आव्हान म्हणून उभे ठाकले. ओमला घेऊन त्याच्या वडीलांच्याच कारखान्यात काम करणारा अक्षय जमदाडे पुणे आणि बीड परिसरात फिरत होता. खंडणीसाठी फोन करताना त्याने दोन वेळा ओमचे त्याच्या वडिलांशी मोबाईलवरून बोलणे करून दिले. हे दोन फोन कॉल खरात कुटुंबीयांसाठी फारच वेदनादायी होते. ओमच्या वडिलांचा कारखाना आहे. अक्षय त्यांच्या कारखान्यात काम करीत होता. दुसरा आरोपी रोशन नंदकुमार शिंदे त्याचा मित्र आहे. रोशनने जानेवारी महिन्यात देहुगावात मोरया मोटार ड्रायव्हिंग स्कूल सुरू केले होते. त्यासाठी त्याने खासगी सावकाराकडून कर्ज काढले होते. मोठ्या प्रमाणावर व्याज द्यावे लागत असल्याने तसेच व्यवसायही चालत नसल्याने त्याला पैशांची चणचण भासू लागली होती. गणेशोत्सवादरम्यान अक्षय आणि रोशन भेटले. त्यावेळी बोलताना दोघांनाही पैशांची गरज असून त्यासाठी काहीतरी करायला हवे असे त्यांचे बोलणे झाले. 15 दिवसांपूर्वी जेव्हा ते पुन्हा भेटले तेव्हा अक्षयने तो काम करीत असलेल्या कारखान्याचे मालक संदीप यांचा मुलगा ओम याचे अपहरण केल्यास भरपूर पैसे मिळतील असे रोशनला सांगितले. त्यानुसार, दोघांनी अपहरण करायचे ठरवले.
कटाची आखणी झाल्यावर दोघांनी जुन्या बाजारात जाऊन एक मोबाईल खरेदी केला. मित्राकडून मोटार काही दिवसांकरीता मागून घेतली. त्यानंतर सतत तीन दिवस संदीप खरात यांच्या घराजवळ पाळत ठेवली. रेकी करुन ओमच्या हालचाली, त्याच्या शाळेत जायच्या वेळा, खेळायच्या वेळा याची माहिती करुन घेतली. देहुगावातील एका टायर दुकानामध्ये जाऊन हवा भरण्याच्या बहाण्याने दुकानात चार्जिंगला लावलेल्या मोबाईलमधील एक सीमकार्ड चोरले. गाडीला बनावट नंबर प्लेट लावल्या. शनिवारी दुपारी ओम सोसायटीमधील मुलांसोबत झाडांना पाणी घालत असताना संधी साधून त्याला उचलून गाडीत घालून पळवले. ओमला पाठीमागील सीटवर बसवून त्याला शहराच्या विविध भागांमध्ये फिरवले. दरम्यान, मोटारीतील डिझेल भरण्यासाठी पैसे नसल्याने त्यांनी अक्षयचा मोबाईल विकला. या रकमेमधून त्यांनी मोटारीत डिझेल भरले. या दोघांनी संदीप यांना फोन करुन मुलाचे अपहरण केल्याची माहिती हिंदीमधून दिली. पोलिसांकडे तक्रार करु नका असेही त्यांनी सांगितले होते. दरम्यान, संदीप यांनी पोलिसांकडे धाव घेत तक्रार दिली. पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांनी हे प्रकरण अत्यंत गांभिर्याने घेतले. पोलिसांनी अत्यंत गुप्तता राखत तपासाला सुरुवात केली. दरम्यान, शहरात थांबणे धोक्याचे आहे हे लक्षात येताच आरोपी ओमला घेऊन रोशनच्या गावी बीड जिल्ह्यामध्ये गेले. बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील त्याच्या गावी ते एक दिवस थांबले. त्यानंतर रविवारी पुन्हा पुण्यात आले. दरम्यान, पुणे पोलिसांनी राज्यातील सर्व पोलिसांना माहिती दिलेली असल्याने बीड जिल्ह्यातील महामार्गांवरही जागोजाग नाकाबंदी झालेली होती. पकडले जाण्याच्या भितीने खेड्यापाड्यातील रस्त्यांने त्यांनी जवळपास 800 किलोमिटरचा प्रवास करुन पुण्यात आले. त्यानंतर, ते अक्षयच्या घराजवळ जाऊन थांबले. जमदाडेने स्वत:ची दुचाकी घेऊन संदीप यांच्या घराजवळ जाऊन नेमकी काय परिस्थिती आहे याची पाहणी केली.
दरम्यान, संदीप यांनी 60 लाख रुपये देणे शक्य नसल्याचे सांगितले. 17 लाखांची खंडणीची रक्कम ठरली. ही रक्कम घेऊन ते देहुरोडला गेले. त्यावेळी निगडी पोलीस ठाण्याचे निरीक्षक (गुन्हे) शंकरराव अवताडे ओमचे काका म्हणून सोबत गेले होते. मात्र, ओमने अवताडे यांना ओळखल्याने आरोपी मोटारीमधून पसार झाले. दोन दिवसांपासून ओमला घेऊन फिरत असताना आरोपींनी त्याला वडापाव खायला दिले होते. सोमवारी अक्षयच्या घराजवळून जात असताना त्यांच्या मोटारीच्या पाठीमागून स्थानिक नगरसेवकाची मोटार येत होती. पोलीस आणि नगरसेवक आपल्या पाठीमागे लागल्याची भीती त्यांना वाटली. जागोजाग पोलीस दिसू लागल्याने त्यांनी ओमला सोडून द्यायचा निर्णय घेतला. त्याला मोटारीच्या डिकीमध्ये कोंबण्यात आले. संदीप यांच्या कारखान्याजवळ त्याला सोडून दिल्यावर फोन करून माहिती दिली. त्यानंतर पोलिसांसह त्याच्या वडिलांनी तेथे जाऊन ओमला ताब्यात घेतले. पसार झालेल्या आरोपींच्या गुन्हे शाखेने मुसक्याही आवळल्या. तब्बल 53 तासांपेक्षा अधिक काळ खरात कुटुंबीयांसह पोलिसांनीही थरार, भीती, दबाव आणि सुटकेचा नि:श्वास अनुभवला. मात्र, पोलिसांच्या संवेदनशीलतेचा आणि संयमाचा परिणाम ओमचे प्राण वाचविण्यात महत्वाचा ठरला हे नक्की.