पुण्यात काँग्रेसला मोठा धक्का? नाराज आबा बागुल देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला
By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2024 12:25 PM2024-04-15T12:25:20+5:302024-04-15T13:33:24+5:30
Pune Loksabha Election 2024 - पुण्यात रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी दिल्यानं काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आबा बागुल नाराज होते. अखेर नाराज बागुल यांनी देवेंद्र फडणवीसांची भेट घेतल्यानं पुण्यात काँग्रेसला धक्का बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
नागपूर - आगामी लोकसभा निवडणुकीनिमित्त पुणे मतदारसंघातून काँग्रेसनं रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी दिली आहे. कसबा पोटनिवडणुकीतील विजयानंतर धंगेकर प्रसिद्धझोतात आले होते. मात्र धंगेकरांना उमेदवारी दिल्यामुळे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आबा बागुल नाराज झाले. बागुल यांनी ही नाराजी जाहीर बोलूनही दाखवली. मात्र आता तेच देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला पोहचल्यानं राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.
पुण्याचे माजी उपमहापौर आबा बागुल यांनी नागपूर इथं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेतली. काँग्रेसनं धंगेकरांनी उमेदवारी दिल्यानं आबा बागुल नाराज होते. त्यांनी पुण्यातील काँग्रेस पक्ष कार्यालयासमोर आंदोलनही केले होते. तेव्हापासून आबा बागुल भाजपा नेत्यांच्या संपर्कात असल्याचं बोललं जात होते. सध्या बागुल हे फडणवीस-बावनकुळे यांच्या भेटीला पोहचले आहेत. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आबा बागुल यांनी भाजपा नेत्यांची भेट घेतल्यानं ते भाजपात प्रवेश करणार का आणि त्यामुळे रवींद्र धंगेकर यांना त्याचा निवडणुकीत फटका बसणार का हे पाहणं गरजेचे आहे.
पुणे लोकसभा मतदारसंघात महायुतीकडून भाजपाचे मुरलीधर मोहोळ विरुद्ध महाविकास आघाडीकडून काँग्रेसचे रवींद्र धंगेकर यांच्यात सामना होणार आहे. मोहोळ यांच्यासमवेत कोरोना काळात त्यांनी महापौर म्हणून केलेल्या कामाचे वलय आहे, तर धंगेकर यांच्याबरोबर कसबा विधानसभेच्या पोटनिवडणुकीत काँग्रेसला विजय मिळवून देताना दाखविलेला करिष्मा आहे. मात्र धंगेकरांच्या उमेदवारीनंतर पुण्यात काँग्रेसचे नाराजीनाट्य दिसून आलं होतं. त्यातूनच पुण्यातील राजकीय वर्तुळात आता ही मोठी घडामोड घडल्यासं दिसून येते.
काय म्हणाले होते आबा बागुल?
पुण्याची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर निष्ठावंत लोकांना धक्का बसला आहे. त्यांना न्याय मिळेल ही अपेक्षा आहे. खरंतर ही निष्ठावंत लोकांची हत्या म्हणायला पाहिजे. ४० वर्ष काम करणाऱ्यांना तिकीट दिलं नाही. आता आलेले आमदार त्यांना तिकीट दिल गेलं. ते शिवसेनेतून मनसेत गेले, तिथून काँग्रेसमध्ये आले. कसबा पोटनिवडणुकीत उमेदवारी दिली. त्यांना आम्ही, पक्षाने मेहनत करून निवडून आणलं. आता लोकसभेसाठी बाळासाहेब शिवलकर, मोहन जोशी, उल्हास पवार, मी असे अनेक कार्यकर्ते असताना पक्षाने काय निकष लावून धंगेकरांना तिकीट दिलं माहित नाही असं विधान आबा बागुल यांनी केले होते.